Thu, Nov 15, 2018 13:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाकुर्लीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

ठाकुर्लीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:51AMडोंबिवली/कल्याण : वार्ताहर

कल्याण-ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडाने मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास विस्कळीत झाली. ठाकुर्ली स्थानकादरम्यान किमी क्र. 51 पोलनजीकच्या सिग्नलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे अप-डाऊन दोन्ही मागार्ंवरील रेल्वे सेवा प्रभावित झाली. लोकल जागच्या हालत नसल्याने प्रवाशांनी ठाकुर्ली, कल्याण, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी जागा मिळेल तेथे लोकलमधून उतरून पटरीतून प्रवास केला. ठाकुर्ली, कल्याणच्या प्रवाशांनी रस्ता वाहतुकीचा पर्याय स्वीकारत मार्ग काढला. तर डोंबिवली मार्गावरील प्रवाशांनी स्थानक गाठणे पसंत केले. रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने एक तासानंतर सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली खरी. मात्र, दुपारच्या सत्रातील वेळापत्रक सपशेल कोलमडले होते. या तांत्रिक बिघाडाने कसारा, कर्जत, बदलापूर मार्गावरील जवळपास दहा लोकल रद्द कराव्या लागल्या. 

डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, ही समस्या 10 मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. चारही मार्गांवरील वाहतूक लोकल कोंडीमुळे अर्धा तास बंद होती. दुपारच्या शिफ्टला कामाला जाणार्‍या प्रवाशांना लेटमार्क लागला. तळपत्या उन्हात ट्रॅक पार करतांना प्रवाशांमध्ये रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी संपली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पेपर देऊन घरी परतताना मोठा त्रास सहन करावा लागला.