Sun, Aug 18, 2019 15:34



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वरळी कोळीवाड्यात आंब्याचे आमिष दाखवत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

वरळी कोळीवाड्यात आंब्याचे आमिष दाखवत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:02AM



मुंबई : प्रतिनिधी

वरळी कोळीवाड्यातील चौपाटीवर खेळत असलेल्या अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीला आंबा खायला देण्याचे आमिष दाखवत घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधम अत्याचार करुन तेवढ्यावरच थांबला नाही, तर याची वाच्यता केल्यास गळा कापून ठार मारण्याची धमकी त्याने या चिमुरडीला दिली. मुलगी रडत असल्याने आईने विचारपूस केल्यानंतर हा भिषण प्रकार समोर आला.

या मुलीचे वडील येथील एका इमारतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे 30 मेच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही चिमुरडी घराबाहेरील चौपाटीवर खेळत होती. याच परिसरात राहात असलेल्या फुलबाबुकूमार यादव (25) याची तिच्यावर वाईट नजर पडली. आंबा खायला देण्याचे आमिष दाखवत यादवने या चिमुरडीला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी रडू लागल्याने तीला शांत करत या नरधामाने याची वाच्यता केल्यास गळा कापून ठार मारुन टाकीन अशी धमकी तिला दिली. 

घडल्याप्रकाराने चिमुरडी प्रचंड घाबरली होती. मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात येताच आईने विचारपूस केली असता विकृत नराधम यादवने केलेले कृत्य समोर आले. अखेर मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी मुलीला सोबत घेऊन दादर पोलीस ठाणे गाठले. वडिलांच्या तक्रारीवरुन आरोपी नराधम यादव विरोधात विनयभंग, बलात्कार आणि जीवे ठार मारल्याची धमकी दिल्याप्रकरणी भादंवी कलम 354 (अ)(ब), 376 आणि 506 (2), तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला. रात्री उशिरा याच परिसरातून यादवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.