Wed, Jul 08, 2020 04:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई

कोरोनामुळे मोबाईलच्या सुट्या भागांची मुंबईत टंचाई

Last Updated: Feb 23 2020 2:09AM
मुंबईः तन्वी सुर्वे
चीन मध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातल्याने चीनमधून मोबाईलच्या सुट्या भागांची आवक पूर्णतः थांबली असून, त्याचा थेट फटका मुंबईतील मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना बसला आहे. सध्या असलेला साठा आणखी पंधरा दिवस किंवा फारतर महिनाभर पुरेल. देशी वस्तूंना कोण हातच लावत नसल्याने आणि त्याच्या किमतीही जास्त असल्याने चिनी बनावटीच्या वस्तूंच्या टंचाईने दुकानेच बंद करण्याची वेळ आली आहे, असे अनेक व्यापार्‍यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रानिक वस्तूंच्या तुलनेत मेड इन चायनाच्या वस्तू दिसायला आकर्षक आणि वाजवी किंमतीत मिळतात. त्यामुळे गिर्‍हाईकांची चिनी वस्तूंना जास्त पसंती असते. चीनमधून मुंबईच्या मार्केटमध्ये येणार्‍या वस्तू गेल्या महिनाभरापासून यायच्या बंद झाल्या आहेत. त्यातून उपलब्ध असलेल्या वस्तूंचे भाव वाढले असून, आम्हाला किंमत वाढवून सुटे भाग विकावे लागत असल्याचे मनिष मार्केटमधील एका व्यापार्‍याने सांगितले. पहिले 100 रुपयाला मिळणारे मोबाईलची डिस्प्ले 400 ते 500 या भावात विक्री होत आहे. कव्हर, स्क्रिन, स्क्रिन गार्ड, चार्जर या वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. पूर्वीच्या आणि आताच्या दरात सुमारे दुपटीने वाढ झालेली आहे.

जानेवारीपासून बंद असलेली चिनी बाजारपेठ अजूनही बंद आहे. केवळ 50 टक्के ऐवढा साठा उपलब्ध असून फक्त दीड महिना पुरावठा होईल इतकाच माल उरला आहे, असे गोल्डन दुकान मालक जिडा शेख यांनी सांगितले. साधारणत: 8 एप्रिलपासून चिनी आवक पुन्हा सुरू होईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ रूळावर येईल, असे सांगण्यात येते. मात्र अजून दिड महिना कसा काढायचा ही चिंताही अनेक व्यापार्‍यांना आहे. नगात सांगायचे झाले तर एका दुकानात महिन्याला 3 हजारपर्यंत मोबाइल कव्हर, हेड फोन, त्याचबरोर वेगवेगळे स्क्रिन गार्ड विक्री होतात. त्याच पटीत आयातदेखील होते. कोट्यवधींची उलाढाल ही केवळ मोबाइलच्या पार्टमधून केली जाते.

मोबाईल, मोबाईल कव्हर, हेडफोन, स्क्रिन गार्ड, मेमरी कार्ड अन्य इतर मोबाईल दुरुस्तीसाठी लागणारे मोबाईलचे पार्टस, यासोबतच पॉवर बँक, विद्युत रोशनाईचे तोरण, बॅटरी आणि रिमोटसाठी लागणारे सेल या सर्वांसाठी चायना वस्तूना अधिक मागणी आहे. तसेच मोबाइलचे आतील काही महत्त्वाचे भाग म्हणजेच मोबाईल चार्जर शोकॅट, स्क्रिन्स डिस्प्ले हे भाग फक्त चीन वरुनच मागवले जातात आणि या वस्तूचे पर्यायी निर्मिती भारतात केली जात नसल्याने दुकाने बंद करण्याशिवाय पर्याय नाही अशी भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.

मेड इन भारत की चायना
भारतीय बनावटीच्या वस्तूपेक्षा चायना वस्तूना अधिक मागणी मुंबईच्या बाजारपेठेत आहे. चायना बनावटीचे चार्जर 100 रुपये तर भारतीय बनावटीच्या चार्जरसाठी 200 रुपये मोजावे लागतात. चायना मेड आकर्षक असल्याने सामान्य व्यक्तीच्या खिश्याला परवडणारे असल्याने त्यालाच पसंती मिळते. भारतीय बनावटीचे मोबाइल कव्हर हे अत्यंत जाड व त्यावरील बनावटी आकर्षक नसतात. शिवाय या वस्तूमध्ये ग्राहकांना विविधता मिळत नसल्याने अनेक ग्राहक त्या नाकारतात. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीनुसार साहित्य ठेवावे लागते, तरच कुठे चार पैसे मिळतात असे मुबंई सिटी सेंटरमधील व्यापारी सांगत होते.

मुंबईतील लोहार चाळ, मनिष मार्केट, दादर या प्रमुख बाजारपेठांनमध्ये प्रामुख्याने विद्युत माळांसह अन्य चीनी साहित्यांची विक्री होते. मात्र गणेशोत्सव, दिवाळी असे मोठे सण आता चालू नसल्याने या परिसरातील दुकानदारावर परीणाम झालेला जाणवत नाही. गणेशोत्सव, दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात मालाची आयात चिन मधून केली जाते. तोच माल वर्षभर पुरविला जात आहे. अजून पाच ते सहा महिने टिकेल ऐवढा साठा उपलब्ध असल्याचे व्यापारी सांगतात. 

कोरोना व्हायरसमुळे कुठलाही फरक लोहार चाळीत, मनिष मार्केट किंवा दादर या बाजारपेठात झालेला नाही. दरवर्षी प्रमाणे लागणारा माल एकदाच मागवला जातो. त्यामुळे विद्युत माळा यांचा साठा पुष्कळ उपलब्ध आहे. विद्युत माळा देशी पद्धतीनेही विविध व्हरायटीमध्ये बनवल्या जातात, त्यामुळे चायना माळांना इतके महत्व नाही. 
संदीप ईलेक्ट्रीकल्स, लोहार चाळ