Thu, Apr 25, 2019 15:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेच्याच कामगारनेत्याला पालिकाबंदी

सेनेच्याच कामगारनेत्याला पालिकाबंदी

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असतानाही, त्यांच्या कामगार नेत्याला पालिका मुख्यालयासह अन्य कार्यालयांत येण्याची बंदी घातली आहे. ही बंदी उठवण्यासाठी शिवसेना नगरसेवक गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे हात जोडून साकडे घालत आहेत. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत, कामगार नेत्यांच्या बंदी आदेशाची मुदत अजून दोन वर्षांनी वाढवली. त्यामुळे शिवसेनेला चांगलीच चपराक बसली आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सलग 20 वर्षे सत्ता आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पण प्रशासनावर शिवसेनेचा अंकुश नसल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे.

वर्षभरापूर्वी युनियनमधील अंतर्गत वादामुळे प्रशासनाने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी कामगार नेते सुनील चिटणीस यांना महापालिका मुख्यालयासह पालिकेच्या अन्य विभाग कार्यालयांत बंदी घातली आहे. सहा महिन्यांपूर्वी या बंदीबद्दल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरले होते. यावेळी प्रशासनाने चौकशी करून, आपल्याला अवगत करण्यात येईल, असे उत्तर दिले. पण आजतागायत बंदीबाबतचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. उलट चिटणीस यांच्यावरील बंदीआदेश अजून दोन वषार्ंनी वाढवला. याकडे सातमकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. चिटणीस यांना कामगारांचे अनेक प्रश्‍न घेऊन, प्रशासनाच्या अधिकार्‍यांची भेट घ्यावी लागते. यावेळी काही वादही होत असतील, यावर उपाय बंदीचा होऊ शकत नाही, असे मतही सातमकर यांनी व्यक्त केले.