Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे

Published On: Jun 19 2018 4:37PM | Last Updated: Jun 19 2018 7:16PMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात भगवा फडकवणारच, असा निश्‍चय शिवसेनेने केला आहे. शिवसैनिकही आता ईर्षेला पोहोचला असून महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार, असा आत्मविश्‍वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला. आपल्या ताकदीचा अंदाज सर्वांनाच आला असून सगळ्यांचे लक्ष शिवसेनेकडे लागले आहे, असे सांगत भाजप सोबतच्या युतीचा मात्र सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला.

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यव्यापी शिबिरात ते बोलत होते. उद्घाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. नेते मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. उदघाटनाच्या सत्रात आदित्य, ठाकरे, मनोहर जोशी यांनी मार्गदशन केले. सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या शिबिराचा समारोप केला. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काश्मीरबाबतच्या धरसोड भूमिकेवर तसेच भाजपच्या पोकळ आश्‍वासनावर टीका केली. आम्हाला आव्हान द्यायला जे पुढे येत आहे, त्यांचे आव्हान मोडू. मात्र, सत्तेच्या लालसेसाठी मला भगवा फडकावयचा नाही आणि अशी लालसा असलेल्यांना मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसूही देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळच फोडला. 

शिवसेनेने बरेच जय आणि पराभव पाहिले आहेत. आम्ही जिंकलो म्हणून कधी माजलो नाही, तसेच हारलो तरी खचलो नाही. उलट अनेक आव्हानांचा आम्ही सामना केला आहे. राज्यभर शिवसेना वाढवताना मिस्ड कॉलवर सदस्य नोंदणी नको, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पक्षनोंदणी अभियानावर निशाणा साधला. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसेना सदस्यत्वाचा नोंदणी अर्ज भरून आपल्या नावाची नोंदणी केली.   भाजपसोबत येणार्‍या निवडणुकीत युती करणार की नाही, अमित शहा यांच्या सोबतच्या भेटीत काय चर्चा झाली याबाबतचा सस्पेन्स मात्र उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवला.

मोदी मंगळावर रवाना झाल्याचे वृत्त येईल

हल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर तबकड्या उडतात, अशा बातम्या येत आहेत. आता सर्व देश फिरून झाले, ते आता परग्रहावर दौर्‍यावर जातील. एकेदिवशी बातमी येईल मोदी मंगळावर रवाना. मात्र, ते तेथूनही थापाच मारतील, अशी शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍याची खिल्ली उडवली. भाजपाने जम्मू-काश्मीरमधील सरकारचा पाठिंबा काढला हे चांगलच केले, पण ज्यांच्यासोबत सत्तेत होतात ते नालायक आहेत हे समजायला तीन वर्षे लागली. सीमेवर 600 जवानांचे बळी गेल्यावर का? असा सवाल त्यांनी केला.

सेना देशभरात न्यायची : आदित्य

 निवडणूका कधीही लागू शकतात. आतापासूनच कामाला लागा, नुसती मतं नाही तर लोकांची मन जिंका. आपल्याला शिवसेना नुसती महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर न्यायची आहे, असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी येथून पुढे स्वबळावरच लढणार आणि जिंकणारही, असा नारा त्यांनी दिला. शिवसेना जन्माला आली नसती तर आज आपण कुठे असतो याचा विचार करा. आज आपण पूर्णपणे सत्तेत नसलो तरी सत्तेत अंकुश ठेवण्याचे काम करत आहोत. 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आपण सर्वांनी स्वबळाचा ठराव मंजूर केला आहे. आतापर्यंत आपण स्वतःची ताकद कधीच बघितली नव्हती, पण आता तसे चालणार नाही.

पालघर लोकसभा निवडणुकीतून त्याची सुरुवात झाली असून साम, दाम, दंड वापरून कागदावर ही निवडणूक कुणी जिंकली असली तरी नैतिक विजय हा शिवसेनेचाच झाला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 2 जागा स्वबळावर  निवडून आल्या. विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्व दहा जागा युवासेनेने जिंकल्या, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच 25 जूनला होणार्‍या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही चारही जागा जिंकायच्याच या ईर्षेने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.