Sat, Sep 22, 2018 06:45



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे हे शिवसेना ठरवणार’

‘दिल्‍ली कुणाची, ते शिवसेना ठरवणार’

Published On: Jun 19 2018 9:43AM | Last Updated: Jun 19 2018 9:46AM



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘‘धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे. अशी गर्जना 'सामना'मधून करण्यात आली आहे.

वाचा : सेनेचा वर्धापन दिन आज; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

देशातील परिस्थिती 'ऑल इज वेज' नसल्याचं शिवसेनेनं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. 'देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणं व राज्य चालवणं मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे, तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्यानं त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं आहे. 

मुंबईतील अनेक भागांची नाव बदलून मुंबई नासवण्याचं काम सुरू असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचं रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचं कारस्थान रचलं आहे. ‘बॉम्बे’चं मुंबई केलं याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावं परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावानं ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावं बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं,' अशी खरमरीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. अर्थात तो नेहमीप्रमाणे दणक्यातच साजरा होईल. ५२ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना एका प्रतिकूल परिस्थितीत झाली. त्यानंतरही असंख्य खाचखळग्यातून, काटय़ाकुटय़ांतून शिवसेनेचा प्रवास झाला आणि त्यावर यशस्वी मात करीत शिवसेना आजच्या शिखरावर पोहोचली आहे. तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. कोणत्याही धनदांडग्यांच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेने भगव्याचे तेज विश्वभरात झळाळून सोडले. ‘भगवा’ हाच हिंदुत्वाचा रक्षक यावर आता कुणाचेही दुमत नाही. तो ‘भगवा’ म्हणजे भेसळीचा नसून शिवरायांचा म्हणजेच शिवसेनेचा, यावर देशाने मोहोर उठवली आहे. शिवसेना नक्की काय व कसे करणार? असे प्रश्न तेव्हा ज्यांना पडले आहेत त्यांच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या, पण शिवसेनेचा वेलू आजही गगनावर का जात आहे, याचा अभ्यास आमच्या विरोधकांनी करायचा आहे. अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे. 

Tags : shivsena,  bjp, pm narendra modi