Tue, Aug 20, 2019 15:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र खरचं तुझी वाट पाहत आहे!

महाराष्ट्र खरचं तुझी वाट पाहत आहे!

Published On: Jun 13 2019 4:26PM | Last Updated: Jun 13 2019 4:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना वाढदिनी खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या शुभेच्छांवरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आदित्य ३० व्या वर्षात प्रवेश करत आहेत. हाच मुद्दा पकडून संजय राऊत यांनी फेसबुकवरून आदित्य यांना शुभेच्छा दिल्या. 

‘महाराष्ट्र खरचं तुझी वाट पाहत आहे’, असे फेसबुकवर पोस्ट करत  संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.  आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंसाठी वरळी आणि शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघांची चाचपणीही झाल्याचे बोलले जात आहे.  

युवासेनेकडून आदित्य यांच्या वाढदिनी आज चांगलेच शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना ‘मातोश्री’वर हजर राहण्यासाठी सागंण्यात आले आहे.  विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना निरोप देण्यात आला. आदित्य यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे यासाठी सर्व शिवसेना आमदारांकडून आग्रह होण्याची शक्यता आहे.