Wed, Jul 24, 2019 12:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचे रक्त भेसळीचे, भगव्याला आव्हान देऊ नका

भाजपचे रक्त भेसळीचे, भगव्याला आव्हान देऊ नका

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:48AMपालघर : वार्ताहर

पोटनिवडणूक ही निवडणुकीसारखीच लढवली जाईल असे मला सुरुवातीला वाटले होते. परंतु, भाजपच्या रक्तामध्ये भेसळ झाली असून या भेसळीच्या रक्ताने अस्सल भगव्या रक्ताला आव्हान देऊ नये, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले. शुक्रवारी संध्याकाळी पालघरच्या सर्कस ग्राऊंडवर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने पाठित वार केल्याचा आरोप केला आहे. परंतु, जर त्यांना थोडीफार मराठी येत असेल तर त्यांनी साध्यासुध्या श्रीनिवास वनगाचे मराठी ऐका म्हणजे कळेल की तो भाजपला त्रासल्याने तसेच त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने शिवसेनेत आला. त्यांना शिवसेनेने पळवून आणले नाही. जर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर समोरासमोर यावे. तुम्ही आरोप करा, मी उत्तरे देतो तसेच मी आरोप करतो तुम्ही उत्तरे द्या असे आव्हानच उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 

आम्ही पाठित वार केल्याचा मुद्दा असेल तर आमचे सुरेश प्रभू, भामरे तुम्ही नेले तेव्हा आमच्या पाठिला गुदगुल्या झाल्या का असा सवालही ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांना केला. सभेला उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाकडे पाहून या सभेच्या निम्मी सभाही भाजपची झाली नाही, अशी टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारच्या सभेत शिवसेना ही बाळासाहेबांची राहिली नाही अशी टीका केली होती. या टिकेचाही उद्धव यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना बाळासाहेबांचीच आहे, आमचे नेते तेच आहेत, आमची जनता तीच आहे, आमचे धनुष्यबाण तेच आहे, आमची तत्त्वे तीच आहेत. मात्र, तुमचा भाजप हा वाजपेयींचा राहिला आहे का? असा प्रतिप्रश्‍न करून भाजप हा मोदींचा धंदेवाईक पक्ष झाला असा घणाघात त्यांनी केला.

बाळासाहेब असताना शिवसेना आणि भाजपचे ऋणानुबंध होते. बाळासाहेब हिंदुत्वासाठी आणि भगव्यासाठी तुमचे लाड सहन करत होते, मात्र मी करणार नाही. आपला मित्रपक्ष येथे असल्याने या लोकसभेकडे आम्ही पूर्वीपासून लक्ष दिले नाही. मात्र, बुलेट ट्रेन, वाढवण प्रकल्प आदी प्रश्‍नांसोबत जनतेसोबत राहण्यासाठी आता येथे लक्ष देण्याची गरज वाटत आहे. एका साध्या आदिवासी पोराने सुटाबुटात देश-विदेश फिरणार्‍या मोदींना घाम फोडला असून तुमच्या तोंडाला फेस आणणारा हा आदिवासी आहे. आम्हला उत्तर प्रदेश किंवा इतर कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आयात करण्याची गरज लागत नाही. ज्या योगीने पायात चपला घालून शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला हार घातला, त्या नालायक योगीला आधी महाराजांची माफी मागायला लावा, अशी टीका उद्धव यांनी केली. तसेच श्रीनिवासला प्रचंड मतांनी विजयी करून गावितांना नंदुरबारला पाठवा असे आवाहन उद्धव यांनी यावेळी केले.

शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी बाबा गेल्यामुळे मला केवळ प्रेम व आधाराची अपेक्षा होती, जी भाजपकडून मला मिळत नव्हती. केवळ या अपेक्षेने शिवसेनेकडे गेलो, त्यांनी मला तो प्रेम व आधार दिला. मी स्वतःहून मातोश्रीवर गेलो. परंतु, मला पाडण्यासाठी  भाजपकडून आजदेखील त्रास दिला जात आहे असा आरोप वनगा यांनी केला. बाबांना देखील पक्षाचे लोक मनासारखे काम करू देत नव्हते, तसा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतात देखील करून ठेवला आहे, असा खुलासा वनगा यांनी यावेळी केला.

या सभेला पर्यावरणमंत्री रामदास कदम, उपनेत्या नीलम गोर्‍हे, रवींद्र वायकर, अनंत गीते, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ध्वनिफित ऐकवण्यात आली.ज्यात मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेद याचा वापर या निवडणुकीत करण्याचे आवाहन केले आपल्या पक्षाला केले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांना इतकी खुमखुमी असेल तर एक निवडणूक होऊन जाऊ दे, त्यानंतर सर्व यंत्रणा बाजूला ठेऊन वेगळी जंग होऊ द्या, असे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले.