Fri, Apr 26, 2019 15:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Published On: Feb 15 2018 2:07PM | Last Updated: Feb 15 2018 2:14PMमुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे विभागप्रमुख नगरसेवक आशिष चेंबूरकर व मंगेश सातमकर यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा गुरूवारी तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनाम्यासाठी थेट मातोश्रीनेच आदेश दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीनंतर महापौर व स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दावेदार असणार्‍या सातमकर व चेंबूरकर यांना डावलून महापौरपद विश्र्वनाथ महाडेश्र्वर व स्थायी समिती अध्यक्ष पद रमेश कोरगावकर यांना बहाल करण्यात आले. एवढेच नाही तर सभागृह नेतेपदी यशवंत जाधव यांना बसवले. या घडामोडीमुळे सातमकर व चेंबूरकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली. शिवसेनेत नाराजी व्यक्त करणार्‍यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येते, हा इतिहास आहे. या नाराजीचा फटका या दोघांना बसला आहे.

पालिकेत सध्या शिवसेनेचा जाधव गटाचे वर्चस्व आहे. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी स्थायी समितीची सर्व सुत्र हाती घेतल्यानंतर आता सातमकर व चेंबूरकर या स्पर्धकांना पालिकेच्या मुख्य प्रवाहातून दूर करण्यात त्यांना यश आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थायी समितीवर पर्यायाने महापालिकेच्या तिजोरीवर जाधव यांचे वर्चस्व राहणार आहे. दरम्यान सातमकर व चेंबूरकर यांचे राजीनामे गुरूवारी होणार्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे समजते. या राजीनाम्या नाट्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.