Sun, Feb 23, 2020 17:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच राष्ट्रवादीची स्थिती

‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच राष्ट्रवादीची स्थिती

Published On: Aug 20 2019 10:42AM | Last Updated: Aug 20 2019 10:50AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेलेल्या कावळ्यांची चिंता न करता मावळ्यांची चिंता करा आणि पक्ष पुढे घेऊन चला, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत, असे ट्विट केले आहे. 

विरोधी पक्षांतील ज्या नेत्यांवर खटले सुरू आहेत. त्यांच्यावर सत्ताधार्‍यांकडून दबाव आणला जात आहे. त्यामुळेच अनेकजण पक्ष सोडत आहेत. मात्र, आता गेलेल्या कावळ्यांची चिंता न करता मावळ्यांची चिंता करा आणि पक्ष पुढे घेऊन चला, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले होते. शरद पवार यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव यांनी, जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता ! असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला. 

उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत. ‘युती’चा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचे कल्याण या एकमेव अजेंडय़ावर सत्ता आणि जागांचे वाटप समान तत्त्वावर होईलच होईल. राज्य मावळय़ांचेच असेल ! असे सांगत उद्धव यांनी ठणकावले.

तसेच, 2014 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती! असेही त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. 

पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहे. आपल्या अस्सल इरसाल कोकणी भाषेत बोलायचे तर ‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच आज राष्ट्रवादीची स्थिती असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.