Wed, Oct 16, 2019 21:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेसाठी भाजप-सेना युती शक्य

विधान परिषदेसाठी भाजप-सेना युती शक्य

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:47AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे सत्तेतील पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेनेने तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले असले तरी भाजपच्या जागेवरील उमेदवार शिवसेनेने जाहीर केलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीची शक्यता व्यक्त केली आहे. 

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 3 मे हा उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. शिवसेनेने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राजीव साबळे, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणी-हिंगोलीमधून विधानपरिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे पुत्र विप्लव बजोरिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपकडे असलेल्या मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेने उमेदवार जाहीर केले असले तरी त्यांनी स्वत:कडे असलेल्या जागाच जाहीर केल्या आहेत. दोन्ही पक्षात युतीची शक्यता आहे. मात्र, शेवटी कधी कधी गडबड होते असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.