Mon, May 20, 2019 20:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तणाव शिगेला असताना अमित शाह आज ‘मातोश्री’वर

तणाव शिगेला असताना अमित शाह आज ‘मातोश्री’वर

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 12:58AMमुंबई : उदय तानपाठक

भाजप आणि शिवसेनेतला तणाव गेल्या काही महिन्यांपासून शिगेला पोहोचला असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या, बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. भाजपने आपल्या दुरावलेल्या मित्रांसह अन्य पक्षांच्या प्रमुखांचा रागरुसवा काढून पुन्हा एकदा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान सुरू केले आहे. शाह हे याच अभियानांतर्गत उद्धव यांना भेटणार आहेत. 

या भेटीत ठाकरे यांच्याशी शाह नेमके काय बोलणार किंवा उद्धव आपल्या तक्रारी शाह यांच्यापुढे मांडणार काय? याबद्दल आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुका त्यांनी भाजपविरोधात लढवलेल्यादेखील आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याखेरीज ठाकरेंचा एकही दिवस जात नाही. भाजपनेही आता सेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी सुरू केलेली असताना अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर जात आहेत. याआधी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी शाह यांनी ‘मातोश्री’वारी केली होती. 

पंचवीसहून अधिक वर्षे टिकलेली सेना-भाजप युती 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र तुटली होती. निवडणुकीनंतर मात्र शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाली होती. अमित शाह हेच युती तुटण्यास जबाबदार असल्याच्या समजाने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. युती तोडावी, या मताचे कट्टर समर्थक असलेले संजय राऊत हे ‘सामना’तून अमित शाह यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. सेनेकडून सतत टीका होत असताना भाजपने मात्र नेहमीच युती टिकली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही युती करण्याची गरज वेळोवेळी जाहीरपणे सांगितली आहे.   

या पार्श्‍वभूमीवर भाजपाध्यक्ष ‘मातोश्री’ भेटीत केवळ भाजपला पाठिंबा मागण्यासाठी नव्हे, तर आगामी लोकसभा निवडणुकीत युतीसाठी ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत असतील. मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली असता, अजून त्यांचा उद्याचा कार्यक्रम निश्‍चित झाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते शाह यांच्यासोबत जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य कुणी नेता शाह यांच्याबरोबर असणार की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. 

मुंबईत उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अमित शाह गुरुवारी अकाली दलाच्या प्रकाशसिंह बादल यांना चंदीगढमध्ये भेटणार आहेत.

एकीकडे, विरोधकांची एकजूट वाढत असताना उत्तर प्रदेशात सपा-बसपाची संभाव्य मैत्री त्रासदायक होईल, याची कल्पना असल्यानेच आता महाराष्ट्रात शिवसेनाही विरोधात लढली, तर परत सरकार येणे अवघड होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळेच ‘एनडीए’चे घटक असलेल्या नाराज पक्षांची मनधरणी करण्यासाठीच हे ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 

आम्ही भूमिका बदलणार 
नाही : संजय राऊत

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसल्याने अनेकांना धडकी भरली असून, अमित शाह यांना चार वर्षांनंतर ‘मातोश्री’वर का यावेसे वाटते, याचा त्यांनीच  विचार करावा. ही परिस्थिती दुर्दैवी आहे. मात्र, शिवसेना ‘एकला चलो रे’ची भूमिका बदलेल असे मला वाटत नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 

‘एनडीए’मधील मित्रपक्ष एकापाठोपाठ सोडून जात आहेत. देशातील राजकारण बदलत आहे. भाजपविरोधात सार्वत्रिक रोष असल्यानेच आता सगळ्यांना भेटून मोट बांधावी असे त्यांना वाटत असेल. त्यामुळेच ही भेट होत असावी, असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला. 

सेना भूमिका बदलणार नाही?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करतानाच यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, अशी भूमिका विचारपूर्वक घेतलेली आहे. जनमताचा कानोसा घेऊन ही भूमिका घेतल्याने या भूमिकेत बदल होईल, असे वाटत नसल्याचे राऊत म्हणाले.

अमित शहा हे केवळ उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार नाहीत. ते टाटा हाऊसमध्ये उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेणार आहेत. याशिवाय ते प्रभुकुंजवर लता मंगेशकर यांची तसेच माधुरी दीक्षीत यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता ते मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या या भेटीगाठी सुरु होणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या आईचे नुकतेच निधन झाले असून ते शेलार कुटुंबियांच्या सांत्वनासाठीही जाणार असल्याचे समजते.