होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेकडून राहुल गांधींचे कौतुक आणि शुभेच्छा!

शिवसेनेकडून राहुल गांधींचे कौतुक आणि शुभेच्छा!

Published On: Dec 18 2017 10:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:24PM

बुकमार्क करा

मुंबई: पुढारी ऑनलाईन

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी हाती घेतल्यानंतर शिवसेनेकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थात या शुभेच्छा देताना शिवसेनेने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला करण्याची संधी सोडली नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातून लिहलेल्या अग्रलेखात त्यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

'सामना'मध्ये 'शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे?', या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या पडझडीवर भाष्य केले आहे. शिवसेनेचे काँग्रेसच्या बेगडी विचारधारेशी मतभेद असल्याचे सांगत अग्रलेखात राहुल गांधी जर देशकाऱ्यासाठी काम करत असतील तर त्यांना शिव्या देण्याऐवजी शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती असल्याचे म्हटले आहे. 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, गुजरात निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला आहे. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. 

राहुल गांधी हे काहीच करु शकणार नाहीत, या मानसिकतेत एक मोठा अंधश्रद्धाळू वर्ग येथे आहे. असे म्हणत अग्रलेखात भाजपला टोला लगावला आहे. 

'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- 

- काँग्रेस पक्षाचे सूत्रधार म्हणून राहुल गांधी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. याचा अर्थ देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही.

- राहुल गांधींसमोर आव्हानांचा डोंगर आहे व हा डोंगर पार करणे त्यांना जमणार नाही अशी हाकाटी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगायला हवा. 

- एखाद्या नेत्याने नवे आव्हान स्वीकारले असेल व त्याच्या मनात देशकार्यासाठी काम करण्याची भावना असेल तर त्यास शिव्या देण्याऐवजी शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. 
 
- काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना हाच आत्मविश्वास पुढे घेऊन जाईल. राहुल गांधी हे काहीच करू शकणार नाहीत, या मानिसकतेत एक मोठा अंधश्रद्धाळू वर्ग येथे आहे. देशाच्या जडणघडणीत नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींचे काहीच योगदान नसल्याचा त्यांचा दावा असतो. खरं म्हणजे आजचे राज्यकर्ते जे खात आहेत व जगत आहेत किंवा देश ज्या मजबूत पायावर उभा आहे त्यात आपल्या राजकीय पूर्वसुरींचेच योगदान आहे. त्याचे विस्मरण म्हणजे अज्ञान व कृतघ्नपणाचा कळस आहे.

- मागच्या साठ वर्षांत काहीच घडले नाही व फक्त कालच्या तीन वर्षांत देश उभा राहिला हे ज्यांना वाटते ती माणसं आहेत की मूर्ख शिरोमणी? देशाचे स्वातंत्र्यही कालच्या वर्षभरातच मिळाले. दीडशे वर्षांचा लढा झूठ होता, असाही नवा इतिहास कदाचित मांडला जाईल व त्याचीही तयारी आपल्याला ठेवावी लागेल अशा बिकट व भ्रमित राष्ट्रीय अवस्थेत राहुल गांधी यांनी काँग्रेसची सूत्रं स्वीकारली आहेत. त्यांना शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही.