होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा (video)

किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा (video)

Published On: Jun 25 2018 11:20AM | Last Updated: Jun 25 2018 11:20AMमहाड: प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 344 व्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते. हा राज्याभिषेक सोहळा 2 दिवस चालणार आहे. यासाठी कालपासूनच हजारो शिवभक्तांनी उत्साहात विविध कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली होती. 

रायगड जिल्हा परिषद, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव, सेवा समिती दुर्गराज रायगड व कोकण कडा मित्र मंडळ रायगडच्या वतीने या श्री शिवराज्याभिषेक दिनाचे गेल्या 20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रातून याकरिता हजारो शिवभक्त प्रतिवर्षी गडावर येत आहेत. गेल्या काही वर्षात ही संख्या फार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने संयोजकांना सर्व शिवभक्तांच्या सोयीकरता अथक प्रयत्न करीत आहेत.

ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1674 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर किल्ले रायगडाच्या राजदरबारात काशी येथील श्री गागाभट्ट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. 

काल द्वादशीच्या दिनी सकाळी 6 वाजता श्री शिरकाई देवीच्या पूजनाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली सकाळी 10 वा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता किल्ले रायगडावरील श्री जगदीश्‍वराच्या मंदिरात निमंत्रित जोडप्यांच्या उपस्थितीमध्ये दुग्धाभिषेक करण्यात आला. तर सायंकाळी 4 वाजता निमंत्रित संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये शिवतुलादान करण्यात आले सायंकाळी 6 वाजता पारंपरिक गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी सातनंतर सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन सुरू करण्यात आले होते.

आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 25 जून रोजी पहाटे 4 वाजता राज्याभिषेक सोहळा सुरु झाला. त्यानंतर सकाळी 5.30 वाजता ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी राज दरबाराकडे प्रस्थान झाली. सकाळी 6 वाजता नगारखान्यासमोर ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. सकाळी 7.15 पासून राजदरबारामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा प्रारंभ झाला. यानंतर सकाळी 8 वाजता छत्रपती शिवरायांच्या पालखी शोभायात्रेचा प्रारंभ झाला.