Fri, Jul 19, 2019 14:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवरायांच्या आरमाराचे दुर्गाडीच्या किनारी स्मारक

शिवरायांच्या आरमाराचे दुर्गाडीच्या किनारी स्मारक

Published On: Feb 11 2018 7:23PM | Last Updated: Feb 11 2018 7:10PMडोंबिवली : बजरंग वाळुंज

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडीच्या किनाऱ्यावर शिवकालीन पाऊलखुणांचे स्मरण म्हणून शिवरायांच्या आरमाराचे स्मारक लवकरच उभारले जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या सिटी पार्कचा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. त्याची निविदा नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत आरमाराचे स्मारक उभारण्यात येणार आहे. निविदा 72 कोटी रुपये खर्चाची असून प्रकल्पासाठी एकूण शंभर कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. 

2010 साली पार पडलेल्या केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांसमोर जाहीरनामा सादर केला होता. या जाहिरनाम्यात सिटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी 2012 मध्ये तत्कालीन महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी हा विषय मंजूर केला होता. तथापी त्याची पूर्तता होत नव्हती. सिटी पार्कचा प्रकल्प हा 1 कोटीचा रुपये खर्चाचा असल्याने इतक्या मोठ्या खर्चासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा नव्हता. परिणामी हा विषय हा कागदावरच राहिला होता. तरीही 2015 सालच्या सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली होती. तरीही प्रकल्पाच्या मार्गाला चालना मिळालेली नव्हती. सिटी पार्क उभारण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. परंतु 2017 साली पालिकेची आर्थिक कोंडी झाल्याने प्रकल्पासाठी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न उभा राहिला. तरीही पालिकेने शहर विकासासाठी 2 हजार 300 रुपये खर्चाचा आराखडा तयार केला. तथापी त्यात सिटी पार्कचा विषय नव्हता. सिटी पार्क आता स्मार्ट सिटी प्रकल्पात रूपांतरीत करण्यात आला. तसा ठराव करण्याची मागणी महासभेत मांडण्यात आली होती. या मागणीनुसार ठराव मंजूरही करण्यात आला. सिटी पार्कसाठी नुकतीच निविदा जाहीर करण्यात आली आहे. या निविदेची रक्कम 72 कोटी रुपये इतकी आहे. पहिल्या टप्प्यात 72 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात 28 कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे. 
       
शिव आरमार स्मारक आणि नाशिकच्या धर्तीवर बॉटीनिकल गार्डन कल्याण पश्चिमेकडे असलेल्या हद्दीलगत उल्हास नदी शेजारी असलेल्या पालिकेचा आरक्षित भूखंडावर सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. नदी किनाऱ्याला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. तेथे लँडस्केप आणि गार्डर्निंग केले जाणार आहे. याच ठिकाणी नाशिकच्या धर्तीवर एक बॉटीनिकल गार्डन विकसीत करण्यात येणार आहे. 

पाण्याचे मनमोहक कारंजे उभारण्यात येईल. विशेष म्हणजे याठिकाणी लेझर शो तयार केला जाणार आहे. सर्व सोयी सुविधांनीयुक्त असे सभागृह देखील बांधण्यात येणार आहे. वाडेघर, उंबर्डे, सापाड या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर कल्याण खाडी किनारा देखील विकसित करण्यात येणार आहे. सिटी पार्कसह दुर्गाडी खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती समरणात रहाव्यात यासाठी शिव आरमार स्मारक उभारण्यात येणार आहे.