Sat, Jun 06, 2020 10:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपला घेरण्याच्या नादात शिवसेनाच फसली!

भाजपला घेरण्याच्या नादात शिवसेनाच फसली!

Published On: Jul 05 2018 11:28AM | Last Updated: Jul 05 2018 11:28AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरी येथील पूल दुर्घटनेला रेल्वेला पर्यायाने भाजपला कोणी टार्गेट करू नये म्हणून भाजप नगरसेवकांनी दुर्घटनेची जबाबदारी बुधवारी मुंबई महानगरपालिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला. हा डाव शिवसेना भाजपवर उलथवू शकली असती. पण भाजपच्या या कट कारस्थानात सत्ताधारी शिवसेनाही पूर्णपणे फसली. भाजपच्या प्रत्येक मुद्या उचलून धरत, शिवसेनेने स्वत:लाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. दुसरीकडे, मुंबईतील पुलांची अवस्था पाहता हा विषय आगामी काळातही महापालिकेच्या सभागृहात येत राहील आणि तेव्हाही शिवसेना-भाजप यांच्यातील चढाओढ दिसून येईल, अशी शक्यता आहे.

अंधेरी पूल दुर्घटनेला हापालिकेला जबाबदार धरून, रेल्वेची यातून सहीसलामत सुटका करून घेण्यासाठी बुधवारी भाजपाने स्थायी समितीत फासा टाकला. या फाशात शिवसेनाही अडकल्यामुळे भाजपा सरस ठरली. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, या पुलाची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, असा आरोपही त्यांनी केला. कोटक यांचा हा मुद्दा भाजपच्या सर्व नगरसेवकांनी उचलून धरला. एवढेच नाही तर शिवसेनेचे मिलिंद वैद्य, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भाजपच्या हरकतीच्या मुद्याला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाने अर्धी लढाई जिंकली.

या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे महापालिकेच्या पूल विभागानेच नाही तर, अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी स्पष्ट केले होते. याचा आधार घेऊन शिवसेना नगरसेवकांना रेल्वे मंत्रालयाला पर्यायाने भाजपाला टार्गेट करता आले असते, पण सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दादरचा टिळक पूल व एलफिन्स्टनच्या जुन्या पुलाचा मुद्दा उपस्थित करून महापालिका प्रशासनाला टार्गेट केले. भाजपचा मुद्दा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उचलून धरत, दुर्घटनेची जबाबदारी निश्‍चित करण्याची वेळ आली आहे. मुंबईकर घरातून बाहेर पडला तर तो पुन्हा घरी सुरक्षित पोहचेल याची कोणीच खात्री देऊ शकत नसल्याची भीती राजा यांनी व्यक्त केली. यावेळी प्रशासनाने रेल्वे हद्दीतील पुलाची जबाबदारी रेल्वेचीच असल्याचे स्पष्टकरण केले असता, भाजपने पूल विभाग खोटे बोलत असल्याचा आरोप करत, स्थायी समिती तहकूब करण्याची मागणी केली. ही मागणी शिवसेनेने तातडीने मान्य केली. त्यामुळे भाजप सरस ठरली.