Tue, Jul 16, 2019 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  इतिहास भाजपला माफ करणार नाही : शिवसेना

 इतिहास भाजपला माफ करणार नाही : शिवसेना

Published On: Jun 21 2018 9:17AM | Last Updated: Jun 21 2018 9:16AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

‘‘नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात? कश्मीरात दहशतवाद वाढला, पाकडय़ांची घुसखोरी आणि हल्ले वाढले आहेत. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढले. हे सर्व रोखणे व राज्य करणे कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. हावरेपणातून कश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली. त्याची फार मोठी किंमत देशाला, सैनिकांना व कश्मीरच्या जनतेला चुकवावी लागली आणि त्याबद्दल इतिहास भाजपला माफ करणार नाही. अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्‍या सामनामधून भाजपवर करण्यात आली आहे. 

इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता. कश्मीर वाचविण्यासाठी कोणती योजना मोदी व त्यांच्या भक्तांकडे आहे? असा प्रश्न सामनामधून विचारण्यात आला आहे. सामनामध्ये म्‍हटले आहे की, ‘‘कश्मीर खोऱ्यात अराजक निर्माण करून भारतीय जनता पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कश्मीरची हालत इतकी कधीच बिघडली नव्हती, रक्ताचे पाट असे कधीच वाहिले नव्हते. हिंदुस्थानी जवानांचे बळी इतक्या मोठय़ा संख्येने कधीच गेले नव्हते. कश्मीरात हे भयंकर प्रकार भाजप राजवटीत घडले, पण या सगळ्याचे खापर मेहबुबा मुफ्तीवर फोडून भाजप साळसूदपणे सत्तेच्या बाहेर पडला आहे. कश्मीरात मेहबुबांबरोबर सत्ता स्थापन करणे हा मूर्खपणाचा आणि फाजील साहसाचाच निर्णय होता, पण देशातील एक राज्य आम्ही मिळवत आहोत. आम्ही अजिंक्य व अपराजित आहोत, आमचे उधळलेले घोडे सारा देश पादाक्रांत करतील या हावरेपणातून कश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली. त्याची फार मोठी किंमत देशाला, सैनिकांना व कश्मीरच्या जनतेला चुकवावी लागली आणि त्याबद्दल इतिहास भाजपला माफ करणार नाही.’’ 

‘‘२०१४ साली लोकांनी मोदीप्रणीत भाजपला मतदान केले व सत्तेवर आणले. यामागचे प्रमुख कारण कश्मीरचा प्रश्न व दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्याची भाषा हेच होते. ५६ इंच छातीची भाषा मोदी यांनी कश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीच्या बाबतीत केली होती. ‘‘कमजोर मनाचे लोक सत्तेवर बसल्याने कश्मीर प्रश्न सुटत नाही. पाकिस्तान मागे हटत नाही,’’ अशा घोषणा जाहीर सभांतून झाल्या तेव्हा मोदी विजयाच्या आरोळ्या कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुमल्या. आम्ही तेव्हा त्या आरोळ्यांचे स्वागत केले, पण त्या आरोळ्या सत्तेनंतर विरून गेल्या व निरपराध जनतेच्या किंकाळ्यांनी कश्मीर खोरे थरारले. प्रत्यक्षात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या राजवटी बऱ्या होत्या असे कपाळावर हात मारून सांगण्याची वेळ तेथील जनतेवर आली. अशी खंतही सामनामधून व्यक्‍त केली आहे.  

‘‘कश्मीरातील जनता रस्त्यावर उतरते व सैनिकांवर हल्ले करते. पाकिस्तानचे अतिरेकी घुसतात व आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात. रोज अनेक जवान शहीद होतात. निरपराध लोक मारले जातात व यावर देशाच्या सुविद्य संरक्षणमंत्री एखादे ट्विट करून सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. पंतप्रधान सतत परदेशात असतात व कश्मीरचे नेमके काय करावे यावर पंतप्रधानांच्या मर्जीतील बाबू लोकांत चिंतन बैठक होते. एके दिवशी अचानक पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानात उतरते, पंतप्रधान नवाज शरीफना भेटायला जातात व हिंदुस्थानातील भक्तगण ‘‘व्वा! व्वा! काय हा मास्टर स्ट्रोक. आता कश्मीर प्रश्न सुटलाच पहा’’ असे झांजा बडवून सांगतात. याला राज्य करणे म्हणत नाही. असा टोला सामधून भाजपला लावला आहे.