Tue, Jul 16, 2019 00:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपाचे पीक जोमात, शेतकरी कोमात : शिवसेना 

भाजपाचे पीक जोमात, शेतकरी कोमात : शिवसेना 

Published On: Jun 22 2018 7:52AM | Last Updated: Jun 22 2018 7:52AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

‘‘शेतकरी आपले हाल उघडय़ा डोळय़ाने बघतो आहे. या सरकारच्या राजवटीत शेतकऱयांचे उत्पन्न तर दुप्पट झाले नाही, पण शेतकऱयांच्या आत्महत्या मात्र दुपटीने वाढल्या आहेत. २०१४ पासून   देशात ४० हजारांवर शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. त्यातही महाराष्ट्रच आघाडीवर. शेतकऱयांच्या आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय याचा विचार न करता मोदी सरकार पुनः पुन्हा तेच ते जुमले ऐकवत सुटले आहे. ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईलच! अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर केली आहे. देशात भाजपाचे पीक जोमात वाढले, मात्र शेती आणि शेतकरी कोमात गेले, अशी टीकाही शिवसेनेने सामनामधून केली आहे.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील शेतकऱयांशी संवाद साधला. देशातील ६००हून अधिक जिल्हय़ांतील शेतकरी पंतप्रधानांचे भाषण ऐकत होते. शिवाय थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून करोडो शेतकरी पंतप्रधान काहीतरी ठोस आश्वासन देतील, किमानपक्षी नवीन जुमला तरी ऐकवतील अशी भाबडी आशा बाळगून टीव्हीसमोर बसले होते, मात्र त्यांचा भ्रमनिरासच झाला. ‘२०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’, अशी गर्जना मोदी यांनी शेतकऱयांशी बोलताना केली. यात नवे ते काय? २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यातही भारतीय जनता पक्षाने हेच आश्वासन शेतकऱयांना दिले होते. याच आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱयांनी काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले आणि भाजपचे खासदार दुपटीने वाढवून त्यांना सत्तेवर आणले. भाजपचे पीक जोमात वाढले आणि देशातील शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र मात्र कोमात गेले. हे वास्तव आहे.’’ अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

सामनामध्ये म्‍हटले आहे की, ‘‘सरकार बदलल्यानंतर शेतकऱयांना खरोखरच न्याय मिळाला आहे काय? कुठलीही बँक आज शेतकऱयांना आपल्या दारातही उभी करत नाही. शेतीसाठी भांडवलच मिळणार नसेल तर कसे होणार शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट? बँकांना चुना लावणाऱया बडय़ा उद्योजकांसाठी मात्र याच बँका गालिचे अंथरतात. मात्र आत्महत्यांच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याची मागणी झाली की हेच सरकार दहा ठिकाणी वाकडे होते आणि सतराशे साठ अटी-शर्ती लादून शेतकऱयांची कर्जमाफी रखडवून ठेवते. हा सापत्न भाव आहे. शेतकरी आपले हाल उघडय़ा डोळय़ाने बघतो आहे. या सरकारच्या राजवटीत शेतकऱयांचे उत्पन्न तर दुप्पट झाले नाही, पण शेतकऱयांच्या आत्महत्या मात्र दुपटीने वाढल्या आहेत. २०१४ पासून   देशात ४० हजारांवर शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. त्यातही महाराष्ट्रच आघाडीवर. शेतकऱयांच्या आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय याचा विचार न करता मोदी सरकार मात्र पुनः पुन्हा तेच ते जुमले ऐकवत सुटले आहे. ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईलच!’’ असा इशाराही शिवसेनेने भाजपला दिला आहे.