Tue, May 21, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत

भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत

Published On: Apr 15 2018 11:40AM | Last Updated: Apr 15 2018 11:40AMडोंबिवली : वार्ताहर

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपने सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, भाजपने आमचा मुका जरी घेतला, तरी आता युती होणे अशक्य असल्याचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. डोंबिवलीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. 

‘‘आम्ही सत्तेतील वाटेकरी नाही तर, टेकूधारी आहोत. सत्तेतील वाटा, घाटा सर्व भाजपचा आहे. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत आहोत. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी एक वेळ यावी लागते ती अद्याप आली नसल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय सत्तेत असतानाही शिवसेनेनं विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावल्यामुळेच अजगरासारखा निपचित पडलेला विरोधी पक्ष जागा झाला आहे. तर, जातीय आणि धार्मिक मुद्द्यांवरून देशात निर्माण झालेलं वातावरण हे भ्रमनिरास करणारे आहे. जातीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र इतका कधीच फाटला नव्हता. काँग्रेसच्या राजवटीतही जेवढी समाजात दुफळी माजली नव्हती तेवढी या सरकारच्या काळात माजल्याचे सांगत, राऊत यांनी भाजपच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. 

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राजकारण, देशातील अस्थिरता, सेना-भाजप संबंध, देशातील लहान मुलींवरील अत्याचार, आदी प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे देत सत्तेतून बाहेर पडण्यासाठी योग्य वेळ आली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, लोकसभा आणि विधानसभेचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला आला आहे. निवडणुकांना उणेपूरे वर्षभराचा कालावधी उरलेला असताना संपूर्ण सत्ता उपभोगून मग सेना सत्तेतून बाहेर पडणार का? याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल असे राऊत यांनी सांगितले. 

वााच : राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार

युती शासनाच्या काळात केवळ आरोप झाले होते, तरी बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची उचलबांगडी केली होती. आताच्या सरकारमध्ये मात्र, तशी धमक नसल्याचेही राऊत म्हणाले. 

Tags : mumbai, shiv sena, leader, sanjay raut, bjp, criticize