Fri, Apr 26, 2019 17:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दमलेल्या सावजाची शिकार मीच करणार : उद्धव ठाकरे

दमलेल्या सावजाची शिकार मीच करणार : उद्धव ठाकरे

Published On: Jul 23 2018 10:19AM | Last Updated: Jul 23 2018 10:18AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

'सावज आता दमलय, या दमलेल्‍या सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.  उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत भाजपवर निशाणा साधला आहे. 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्‍तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्‍हणाले की, 'माझ्या खांद्यावर कुणाचीही बंदूक नाही. बंदूक माझ्या हातात आहे. त्यामुळे सावज टप्प्यात आल्यानंतरच मी बार उडवणार, काही वेळा सावजावर गोळी मारण्याचीही गरज नसते. ते पळून पळून पण पडू शकते, ज्या शिवाजी महाराजांनी कृष्णाने सांगितलेली गीता अंमलात आणली. त्या शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय?,' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्‍थित केला.  

‘‘गाईची रक्षा करताना आपला हिंदुस्थान हा स्त्रीयांसाठी जगात सर्वात असुरक्षित देश बनला आहे. याची खरं तर लाज वाटली पाहिजे. गोमाता वाचली पाहिजे, पण माझी माता? तिचं काय? तिला न वाचवता तुम्ही गाईचं मांस खाल्लं का? याच्यामागे लागणार असाल तर हे सगळं थोतांड आहे. हे हिंदुत्व नाही. असा संतापही  उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला. 

'आम्ही जे करतो ते विरोधाला विरोध म्हणून कधीच करीत नाही. त्याचसाठी शिवसेनेने अविश्वासदर्शक ठरावावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, कुणाच्याही मागे आम्ही फरफटत जाणार नाही. कुणाच्याही दुसऱ्याच्या लढाईची बंदूक मी शिवसेनेच्या खांद्यावर ठेवू देणार नाही. जनतेची लढाई शिवसेना, शिवसेना म्हणून लढेल, पण याच्यामागे फरफटत जाणं आणि त्याच्याही मागे फरफटत जाणं हे असे फरफटत जाणारे आम्ही नाहीत,' असेही  उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.