Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर शिल्पाचा माफीनामा; सलमानचे काय?

अखेर शिल्पाचा माफीनामा; सलमानचे काय?

Published On: Dec 24 2017 1:21PM | Last Updated: Dec 24 2017 1:58PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

वाल्मीकी समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी माफी मागितली आहे. शिल्पाने ट्विटरवरून माफी मागितली आहे. गेल्या दोन दिवसांपासून याप्रकरणावरून शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांच्याविरोधात देशभरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळण्यात आले. याच मुद्द्यावरून सलमानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाला देखील विरोध केला जात आहे. यावर शिल्पा शेट्टीने माफी मागितली असली, तरी सलमानने यावर काहीच खुलासा केला नाही.  

‘एका मुलाखतीवेळी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता, माझ्या बोलण्याने जर कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागते. आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात आणि मी ही अशाच देशात राहते याचा मला गर्व आहे, मी त्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करते’ असे ट्विट शिल्पाने केले आहे. 

एका मुलाखतीत सलमान खानने त्याचं नृत्यकौशल्य सांगताना जातिवाचक शब्दाचा वापर केला होता. शिल्पा शेट्टीनेही ती घरी कशी दिसते, हे सांगण्यासाठी याच शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे. वाल्मीकी समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी सलमान आणि शिल्पा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमानच्या या वक्तव्याचा फटका ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाला बसेल असे वाटत होते. मात्र ‘टायगर’ची बॉक्सऑफीसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.