Thu, Sep 19, 2019 03:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'एनडीए'ची पुन्हा सत्ता? एक्झिट पोलनंतर 'सेन्सेक्स'ने तोडले १० वर्षाचे रेकॉर्ड

'एनडीए'ची पुन्हा सत्ता? एक्झिट पोलनंतर 'सेन्सेक्स'ने तोडले १० वर्षाचे रेकॉर्ड

Published On: May 20 2019 10:21AM | Last Updated: May 20 2019 4:22PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एक्झिट पोलने फिर एक बार मोदी सरकारचे सुतोवाच केल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज विक्रमी उसळी घेतली. त्याचबरोबर निफ्टीही वधारला. सेन्सेक्स १,४२१.९० अंकांनी वाढून ३९,३५२.६७ अंकावर बंद झाला. तर निफ्टी ४२१ अंकांनी वाढून ११,८२८ वर पोहचला. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत आज सेन्सेक्सने गाठलेली ही सर्वोच्च पातळी आहे.

सकाळच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सेंज ९४६ अंकांनी वधारून ३८,८७७.०१ वर सुरू झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सेंजही २४७ अकांनी वाढून ११, ६५१. ९० वर सुरु झाला. शुक्रवारी सेन्सेक्स ३७,९३०.७७ वर बंद झाला होता, निफ्टी ११, ४०७.१५ वर बंद झाला होता. एक्झिट पोलमधील अंदाज आता सत्यात उतरल्यास बाजारात तेजी दिसून येईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. 

काल सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार विराजमान होणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. त्याचा अनुकूल परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले.

एक्झिट पोलच्या निष्कर्षामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. यामुळे शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने विक्रमी उसळी घेतल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.