Wed, May 22, 2019 10:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभेसाठी महाआघाडीला ब्रेक?; शरद पवारांचे सूचक वक्तव्य

लोकसभेसाठी महाआघाडीला ब्रेक?; शरद पवारांचे सूचक वक्तव्य

Published On: Jun 30 2018 12:46PM | Last Updated: Jun 30 2018 12:47PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

आगामी लोकसभेसाठी निवडणुकपूर्व भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या महाआघाडीबाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कादायक विधान केले आहे. भाजपविरोधात महाआघाडी किंवा तिसरी आघाडी योग्य नाही. त्याचा लोकसभेत किती फायदा होईल याबाबत शंका असल्याचे, शरद पवार म्हणाले. नुकतेच माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एचडी देवगौडा यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवारांच्या या वक्तव्याने लोकसभेच्या मैदानात वेगळ्याच रणनितीचे संकेत दिले आहेत.

एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीवेळी शरद पवार म्हणाले की, तिसऱ्या आघाडीच्या रुपाने वेगवेगळ्या पक्षांनी आघाडी करणे हे व्यवहारात बसणारे नाही. सध्या महाआघाडी करण्याची अनेक सहकारी पक्षांची इच्छा आहे. शरद पवार यांना पंतप्रधान पदाबाबत विचारले असता म्हणाले की, आणीबाणीच्या निर्णयाने १९७७ मध्ये काँग्रेसला झटका बसला होता. त्यानंतर जनसंघाचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हा कोणत्याच पक्षाने निवडणुकीपूर्वी आघाडी केली नव्हती. निवडणुकीनंतर विजयी पक्ष काँग्रेसच्या विरोधात एकत्र झाले आणि सरकार स्थापन केले. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. त्यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घोषित करण्यात आलेले नव्हते. सध्याही तशीच परिस्थितीत आहे. त्यामुळे कोण पंतपधान होईल हे सांगता येणार नसल्याचे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.

वाचा : ►२०१९ला भाजप, काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचे आव्हान

तिसरी आघाडी किंवा महाआघाडीची कोणतीही शक्यता नसल्याचे माझे प्रामाणिक मत असल्याचे शरद पवार म्हणाले. माजी पंतप्रधान एचडी.देवगौडा यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना लवकर केली पाहिजे असे म्हटले होते. तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढच्या विधानसभेसोबतच लोकसभेच्या निवडणुका एप्रिल ऐवजी डिसेंबरमध्ये घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना कमी लेखू नये. प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षाने काँग्रेसला साथ देण्याची गरज नसल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते.

वाचा : ►‘काँग्रेस-जेडीएस युती तुटणार; लवकरच भाजपचे सरकार’