Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कळस्करची कोठडी फेटाळल्याने सीबीआयची अडचण

कळस्करची कोठडी फेटाळल्याने CBIची अडचण

Published On: Aug 30 2018 2:20AM | Last Updated: Aug 30 2018 9:34AMमुंबई : अवधूत खराडे

एसटीएसच्या कोठडीत असलेल्या शरद कळस्कर याच्या कोठडी किंवा ताब्याच्या मागणीचा अर्जच सत्र न्यायालयाने फेटाळल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयची सर्व गणिते चुकली आहेत. कळस्कर याच्या कोठडीची मुदत 3 ऑगस्टला संपणार आहे. त्याआधी म्हणजेच 2 सप्टेंबरला डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचीन अंधुरे याच्या 14 दिवसांच्या कोठडीची मुदतच संपेल. त्यामुळे आता दोघांनाही समोरासमोर बसवून एकत्रीत चौकशीच करता येणार नसल्याने सीबीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास हाती आल्यानंतर सीबीआयने याप्रकरणी तपास करत डॉ. विरेंद्र तावडे यांना अटक केली. तर सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघेजण गोळ्या झाडणारे मारेकरी असल्याचे नमूद करुन आरोपपत्र न्यायालयात सादर केले. दरम्यान, तब्बल दोन वर्षांनी या हत्याकांडात खळबळजनक खुलासा एटीएसच्या तपासात झाला. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपींतील कळस्कर याने औरंगाबादमधील रहिवाशी सचीन अंधूरे याच्यासोबत डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली. एटीएसने अंधुरेला 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेत चौकशी करुन याची खातरजमाही केली.

एटीएसकडून याची माहिती मिळताच 16 ऑगस्टला सीबीआयने अंधुरेला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याच्याकडे तब्बल दोन दिवस कसून चौकशी केली. अखेर 18 ऑगस्टच्या रात्री सीबीआयने त्याला डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक केली. दुसर्‍या दिवशी सकाळी सीबीआयने त्याला पुणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीमध्ये अंधुरेने पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक असलेल्या एका आरोपीने एक पिस्तूल आणि काडतूसे आपल्याकडे दिल्याची धक्कादायक कबुली सीबीआयला दिली. त्यानुसार एटीएसच्या मदतीने कारवाई करत सीबीआयने हे पिस्तूल आणि काडतूसे जप्त केली. मात्र अंधुरेसोबत कळस्करला समोरासमोर बसवून एकत्रीत चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सीबीआयच्या लक्षात आले.सीबीआयने हे न्यायालयाच्या निर्दशनास आणून देताच, उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास करत असल्याने पुणे न्यायालयानेही कळस्कर विरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी केले. याच वॉरंटच्या आधारे सीबीआयचे पथक आणि वकील एटीएसच्या ताब्यातील आरोपी कळस्करचा ताबा मागण्यासाठी मंगळवारी सत्र न्यायालयात हजर झाले होते. अंधुरेची कोठडी 30 तारखेला संपत असून त्याला वाढीव कोठडी न मिळाल्यास दोघांची एकत्रीत चौकशी करणे शक्य होणार नाही. तसेच डॉ. दाभोलकर यांचे हत्याप्रकरण संवेदनशील असल्याने कळस्करचा ताबा मिळणे अत्यावश्यक असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.

सीबीआयचा हा अर्ज कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे सीबीआयची पंचाईत झाली. अखेर सीबीआयने अवघ्या दोन दिवासांचा ताबा तरी द्या, अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र सीबीआयच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत कळस्कर याच्या कोठडीची मुदत 3 ऑगस्टला संपणार आहे, त्यावेळी मागणी करा असे बजावून अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे सीबीआयसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

सीबीआयला हे भोवले

एटीएसच्या कोठडीमध्ये असलेल्या शरद कळस्कर याच्या कोठडी चौकशीची आवश्यकता भासताच सीबीआयने पूणे न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला. न्यायालयाने हे वॉरंट बजावलेसुद्धा. मात्र सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केलाच नाही. कळस्करची कोठडी मुदत संपताना 28 ऑगस्टला अर्ज केला, तोसुद्धा न्यायालयाने त्याच्या एटीएस कोठडीत 7 दिवसांची वाढ केल्यानंतर, आणि हेच सीबीआयला भोवले आहे.

एटीएसची अजब मागणी

सीबीआयला ना हरकत देताना एटीएसने कळस्करला आतापर्यंत 18 दिवसांची कोठडी न्यायालयाने दिली आहे. 30 दिवसांपैकी त्याची 12 दिवसांची कोठडी उरली आहे. आरोपी सीबीआयच्या ताब्यात गेल्यास एटीएसला ही कोठडी मिळणार नाही. त्यामुळे आरोपीचा ताबा, कोठडी सीबीआयला द्या. त्यानंतर मात्र आपली उरलेली 12 दिवसांची कोठडी मिळावी अशी अजब मागणी एटीएसने न्यायालयात केली होती. त्यामुळे 3 सप्टेंबरलाही एटीएस कळस्करच्या वाढीव कोठडीची मागणी करणार हे स्पष्ट आहे.