Thu, Jul 18, 2019 21:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सातवा वेतन आयोग जानेवारीपासून!

सातवा वेतन आयोग जानेवारीपासून!

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी 2019 पासून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. वेतन आयोगाच्या लाभाबरोबरच 2017 मधील थकीत महागाई भत्त्याची रक्‍कमदेखील देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी शनिवारी ‘वर्षा’ निवासस्थानी अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केली.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्धारित तारखेपासूनच (जानेवारी, 2016) सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. यासाठी शासनाने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे; पण सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या. त्या त्रुटींसंदर्भात सुनावण्या घेण्याचे काम बक्षी समिती करत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचा अहवाल शासनास सादर करू, असे त्यांनी कळविले आहे. या अहवालानंतर कर्मचार्‍यांना चांगली वेतनवाढ देणारा सातवा वेतन आयोग निर्धारित तारखेपासून लागू करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या सर्व प्रकियेस काही कालावधी लागणार असल्याने कर्मचार्‍यांसाठी वेतनलाभ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.  त्यानुसार केंद्र शासनाच्या वेतन निश्‍चितीच्या सूत्रानुसार जानेवारी 2019 पासून वेतन लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महागाई भत्त्याची 14 महिन्यांची थकबाकी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबींसाठी अंदाजे 4 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतही शक्य तितक्या लवकर निर्णय घेईल. चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. तत्पूर्वी मुख्य सचिवांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांसमवेत बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. याशिवाय नवीन अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा सुचविण्यासाठी व शंका निरसनासाठी शासन स्तरावर अभ्यासगटाची नेमणूक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.