Sat, Apr 04, 2020 17:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षकांचा सातवा वेतन लांबणीवर?

शिक्षकांचा सातवा वेतन लांबणीवर?

Last Updated: Feb 19 2020 1:24AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन निर्णय जाहीर होऊन एक वर्ष झाल्यानंतर शिक्षक अद्याप थकबाकीपासून वंचित आहेत. या महिन्यात थकबाकी दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अनुदान निधी नसल्याने मार्च महिन्यापर्यंत ही थकबाकी मिळणे अवघड असल्याचे सूत्रांकडून समजते. जानेवारी, फेब्रुवारीचे वेतन उणे बिलातून होत असल्याने थकबाकी कशी देणार, असा प्रश्न शिक्षक करत आहेत.

22 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला. यानंतर थकबाकीसंदर्भात वित्त विभागाने 30 मे 2019 रोजी आदेशही काढले होते. पाच समान हप्त्यात ही थकबाकी मिळेल, असे या आदेशात स्पष्ट केले. शालेय शिक्षण विभागाने सादर केलेला प्रस्ताव तब्बल पाच महिने मान्य झाला नाही. प्रस्ताव मान्यतेनंतर थकबाकी लवकर मिळेल फेब्रुवारीचे वेतनात मिळेल ही आशा होती मात्र निराशा केल्याची टीका केली आहे.

गेल्या 10 जानेवारीला शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारीच्या नियमित वेतनाबरोबर थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे आदेश काढले. मात्र या वेतनाबरोबर थकबाकीचा पहिला हप्ता देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे अनुदानच शिल्लक नाही. विशेष म्हणजे नव्याने अनुदानही मिळाले नसल्याने  थकबाकी मिळणे कठीण होणार आहे. नियमित वेतनासाठी फक्त 80 टक्केच वेतन अनुदान उपलब्ध असल्याचे समजते. त्यामुळे जानेवारी व फेब्रुवारीचे वेतन उणे बिलातून होत असल्याने थकबाकीचा पहिला हप्ता मिळणे कठीण असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे वर्षभराचा कालावधी उलटून गेला व फेब्रुवारीतही ही थकबाकी मिळणार नसल्याने शिक्षकवर्गात तीव— नाराजी पसरली आहे.