Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठांच्या 14 पत्रांना सरकारकडून केराची टोपली

ज्येष्ठांच्या 14 पत्रांना सरकारकडून केराची टोपली

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:44AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

काँग्रेस आघाडी सरकारने 1 ऑक्टोबर 2013 रोजी जाहीर केलेले राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण अद्यापही कागदावरच असून  या धोरणाचा शासनादेश काढावा या मागणीसाठी विद्यमान सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाला आतापर्यंत पाठविलेल्या चौदा पत्रांना केराची टोपली दाखविल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अखेरीस आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीच्यावतीने 2 मे रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही ज्येष्ठ नागरिक संयुक्त  कृती समितीला दिली होती. या धोरणाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे आश्‍वासन सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री अ‍ॅड. राजकुमार बडोले यांनीही विधिमंडळात दिले होते.  त्याची आठवण करून देणारी  चौदा पत्रे मुख्यमंत्री कार्यालयास पाठवूनही त्यांस एकदाही उत्तर आले नाही, अशी खंत कृती समितीचे अध्यक्ष डॉ. शं. पा. किंजवडेकर व उपाध्यक्ष अन्नासाहेब टेकाळे यांनी व्यक्त केली. राज्यात सध्या 1 कोटी 25 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. दर तीन वर्षांनी या संख्येमध्ये भर पडते. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचेही या नेत्यांनी स्पष्ट केले.