होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुन्हेशाखेच्या प्रमुख पदावर डोळा ठेवलेल्याचा हिरमोड

गुन्हेशाखेच्या प्रमुख पदावर डोळा ठेवलेल्याचा हिरमोड

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:07AMमुंबई : अवधूत खराडे

तब्बल पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बढत्या आणि बदल्यांना मुहूर्त मिळाला आहे. शासनाने यावेळीही धक्कातंत्राचा वापर करत अनपेक्षीत बदल्या केल्या आहेत. यात काहींचा हिरमोड झाला असून काहींना चांगल्या ठिकाणी पोस्टींग मिळवण्यात यश आले आहे.

मुंबई पोलीस दलातील गुन्हेशाखेच्या प्रमुख पदावर गेल्या काही वर्षांपासून डोळा ठेऊन असलेल्या एका वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍याचा या बदल्यामुळे हिरमोड झाला आहे. या अधिकार्‍याला चांगल्या पोस्टींग मिळत राहिल्याने संपूर्ण आयपीएस लॉबीमधून जोरदार विरोध झाला होता. वादग्रस्त चकमकीनंतर पोलीस दलात सामील झालेल्या एका अधिकार्‍यानेही या अधिकार्‍याची नाकाबंदी करण्यात महत्वाची भूमिका बजवली होती. त्यामुळेच हा अधिकारी डोळे ठेऊन असलेल्या पोस्टींगला मुकल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच अधिकार्‍याविरोधात आवाज उठवून मुंबईत पोस्टींग मिळविलेल्या अधिकार्‍याची वर्णी लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच मुंबई बाहेरील एक अमराठी अधिकारीही चांगली पोस्टींग मिळविण्यात यशश्‍वी झाला आहे.

मुंबई पोलीस दलातील आणखी एक महत्वाचे पद आता पोस्टींगसाठी शिल्लक राहीले असल्याने या पदासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे येत्या काळात या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण मुंबई पोलीस दलाचे लक्ष लागले आहे. 

शासनाने आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली असून येत्या काही दिवसांत आणखी काही अधिकार्‍यांच्या बढत्या होणार आहेत. तर पदावरील कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकार्‍यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून क्रिम पोस्टींगवर डोळा ठेऊन काही अधिकार्‍यांनी फिल्डींग लावली आहे. या अधिकार्‍यांचे स्वप्न पुर्ण होते कि शासनाच्या धक्कातंत्रामुळे हिरमोड होतो, हे येणारा काळच ठरविणार आहे.

आयपीएस लॉबीत असलेल्या वादातून एका अधिकार्‍याचे अधिकार, केबीन काढून घेत पंख छाटण्याचे प्रयत्न केल्यानंतर हे वाद विकोपाला गेले होते. या अधिकार्‍याला अखेर एका परीक्षेत्रात नियुक्ती देण्यात आली असून येथील गुन्हेगारीवर आळा बसविण्याची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अधिकार्‍याच्या बदलीने रिक्त झालेल्या पदासाठीही अनेकांनी फिल्डींग लावल्याची माहिती मिळते.