Tue, Jul 14, 2020 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तारावरुन सेनेत खदखद

मंत्रिमंडळ विस्तारावरुन सेनेत खदखद

Published On: Jun 13 2019 1:35AM | Last Updated: Jun 13 2019 1:00AM
मुंबई : दिलीप सपाटे 

मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा असताना शिवसेना आमदारांमध्ये मात्र या विस्तारावरुन खदखद निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य खाते देण्याचे प्रयत्न असल्याने ही नाराजी आहे. विस्तार करताना विधानपरिषद सदस्य असलेल्या शिवसेना मंत्र्यांना वगळून विधानसभेतील आमदारांना संधी देण्याचीही आमदार मागणी करीत आहेत. 

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मंत्रिमंडळाचा अखेरचा विस्तार करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विस्तार करण्यास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हीरवा कंदील दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनापूर्वीच विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे. मात्र, शिवसेनेत या विस्तारावरुन अंतर्गत नाराजी सुरु झाली आहे. 

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले सार्वजनिक आरोग्य खाते देण्यात येणार आहे. मात्र, हे खाते लोकांशी थेट सबंधीत आहे. शिंदे यांनी या खात्याचा पदभार घेतल्यानंतर या खात्याला चालना दिली असल्याने व आमदारांचे या खात्याशी सबंधीत विषय सोडविण्याची भूमिका घेतल्याने हे खाते शिंदे यांच्यासारख्या शिवसेनेशी निष्ठावंत मंत्र्याकडे असावे, अशी आमदारांची भूमिका आहे. 

गुरुवारी युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्यासह एकत्रितपणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी त्यांच्या कानावरही आमदारांची भूमिका घालण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका आमदाराने दिली. तर, 40 आमदार विस्ताराबाबत भूमिका पक्षाकडे लेखी स्वरुपातही मांडतील, अशी माहिती मराठवाड्यातील शिवसेनेच्या एका आमदाराने दिली. 

विधानपरिषदेचे सदस्य असलेले शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारख्या नेत्यांना महत्वाची खाती देण्यात आली आहेत. विधानसभा निवडणूक पहाता त्यापैकी एक दोन लोकांना तरी वगळून तेथे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना संधी द्यावी, अशी चर्चाही शिवसेना आमदारात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार शिवसेनेसाठी अडचणीचा बनला आहे. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेत खदखद सुरू आहे.

भाजपकडून डॉ. अनिल बोंडे, योगेश सागरही चर्चेत 

भाजपकडून पाच ते सहा जणांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्पाप्रकरणी लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे मेहता यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो. अशावेळी मुंबईतून योगेश सागर यांना त्यांच्या जागी संधी दिली जाऊ शकते. मुंबईतून आमदार आशिष शेलार यांच्याबरोबर त्यांचेही नाव चर्चेत आहे. विदर्भातील आमदार डॉ. अनिल बोंडे यांचे नावही शर्यतीत आले आहे. मराठवाडयातील एक आणि नाशिकमधून एका आमदाराला संधी दिली जाऊ शकते.