Wed, Nov 21, 2018 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना मंत्र्यांमध्येही फेरबदल शक्य

सेना मंत्र्यांमध्येही फेरबदल शक्य

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

एप्रिल अखेरीस होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्याही काही मंत्र्यांमध्ये बदल केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपकडून देण्यात आली आहे.  

नारायण राणे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यानंतर विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या दोन ते तीन मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता असून चार ते पाच नव्या चेहर्‍यांचा समावेश केला जाणार आहे.  

मंत्रिमंडळात शिवसेनेचे 12 मंत्री आहेत. शिवसेनेचा मंत्रिमंडळातील कोटा संपल्याने अतिरिक्‍त मंत्रीपदे शिवसेनेला दिली जाणार नसल्याचे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आहे त्यातील मंत्र्यांना कमी करून नवीन चेहर्‍यांना संधी द्यावी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत किंवा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापैकी एकाला वगळण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेत आहे. 

मंत्रिमंडळ समावेशासाठी शिवसेनेत अनेक आमदार इच्छुक आहेत. मंत्रीपदासाठी आमदार निलम गोर्‍हे, अ‍ॅड. अनिल परब किंवा सुनील प्रभू या नावांचा विचार होऊ शकतो.