Sat, Jan 25, 2020 07:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त; राज ठाकरे ईडीमध्ये, कुटुंबीय, मनसे पदाधिकारी हॉटेलमध्ये! 

दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त; राज ठाकरे ईडीमध्ये, कुटुंबीय, मनसे पदाधिकारी हॉटेलमध्ये! 

Published On: Aug 22 2019 1:52PM | Last Updated: Aug 22 2019 1:52PM
मुंबई : प्रतिनिधी

कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी होत आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेत पोलिसांनी दादर आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. ईडीच्या नोटीसीनंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले असले तरी छुप्या पद्धतीने तयारी करून ऐनवेळी विरोध प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह काही नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

कोहिनूर मिल गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी आणि भागीदार राजन शिरोडकर यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणी राज ठाकरे यांना नोटीस मिळाल्यापासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. कारवाईविरोधात बंद तसेच अन्य पद्धतीने विरोध करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत कुणीही ईडी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये असे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवत त्यांची धरपकड केली आहे.

बुधवारी रात्रीपासूनच दादर, शिवाजी पार्क आणि वरळी पोलिसांना राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानासोबतच संपूर्ण दादर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहे. तर दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालय परिसरात कुलाबा, कफपरेड, मरिन ड्राईव्ह, माता रमाबाई आंबेडकर मार्ग आणि आझाद मैदान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ईडी कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लाऊन या परिसरात प्रवेश बंदी केली आहे. 

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राज ठाकरे हे सहकुटुंब ईडी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा ताफ़ा साडेअकराच्या सुमारास ईडी कार्यालयाजवळ पोहोचला. यासाठी पोलिसांनी संपूर्ण मार्गाचे योग्य नियोजन करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवली होती. ईडी कार्यालयाजवळ कारमधून उतरून राज ठाकरे यांनी ईडीच्या इमारतीमध्ये प्रवेश करताच पोलिसांनी इमारतीचे प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे राज यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मनसे पदाधिकारी जवळच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. येथेही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. 

कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका अशा सूचना करत, या सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी मनसे नेते, पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसीद्वारे बजावले आहेत.