Mon, Aug 19, 2019 09:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेचीच राहील, अशा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी या वर्षीपासून करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल्यानंतर त्यावर मुख्याध्यापक संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कुणाची हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शासनाने फक्त शासननिर्णय काढून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांवर लादू नये. यातील अनेक बाबी आर्थिक तयारीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत, विद्यार्थी सुरक्षा शाळांनीच पाहायची तर मग शालेय शिक्षण विभाग काय करणार, असा सवाल मुंबई मुख्याध्यापक संघटनेने केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे. शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात तसेच प्रवेशद्वारावर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभारावी अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. याला विरोध करत शासनाने फक्त शासननिर्णय काढून ही जबाबदारी शाळांवर लादू नये. यातील अनेक बाबी आर्थिक तयारीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत.

शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नाहीत व त्या भरतीवर शासनाची बंदी आहे. एसएमएस सेवा पुरविण्यास निधी कोठून आणायचा? विनाअनुदानित शाळा पुन्हा फी वाढविणार तर अनुदानित शाळा कोणाच्या तोंडाकडे बघणार,या सेवा शासनाने पुरवाव्यात.राहिला प्रश्न तक्रार पेटी व शालेय सुरक्षा समितीचा, ती प्रत्येक शाळेमध्ये आहे. आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची की त्यांची सुरक्षा शिक्षकांनी करायची? शासनाने याबरोबर आपलाही आर्थिक सहकार्याचा हात द्यावा, अन्यथा हे सर्व पालकांच्या माथी पडणार असल्याने शिक्षण विभाग काही करणार आहे की नाही, असा सवाल मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केला आहे.