Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळांचा गोंधळ; मुसळधार पावसात सोडल्या शाळा

शाळांचा गोंधळ; मुसळधार पावसात सोडल्या शाळा

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी

सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा निर्णय क्षणार्धात पोहचत असताना शालेय शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील शाळांमध्ये मात्र मंगळवारी सुटीचा संभ्रम सुरु होता. मुंबईत पावसाचा जोर पाहून मुख्याध्यापकांनी सुटी जाहीर करावी अशा सूचना शिक्षण संचालकांना दिल्या असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली खरी मात्र बहुतांश शाळांत मुख्याध्यापकच पावसामुळे पोहचले नसल्याने सुटी कोणी जाहीर करायची हा प्रश्‍न शाळांतील उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पडला होता. सकाळच्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांचे एवढ्या पावसात करायचे काय असा यक्षप्रश्‍न अनेक शाळांना पडला होता. तर अतिउत्साहाने सकाळी मुलांना पाठवलेल्या पालकांचे फोन दिवसभर खणखणत होते, तर कोण मुलांना घेऊन जाते हेच कळत नसल्याने मुंबईतील शाळांत मंगळवारचा दिवस गोंधळाचा होता.

मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना शिक्षणमंत्र्यांनी सोमवारी सुटी जाहीर केली. मात्र मंगळवारी सकाळी थोडी पावसाची उघडीप राहिल्याने सकाळच्या सत्रातील विद्यार्थी पोहचले, दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मुंबईसह उपनगरात एकच संभ्रम वाढला. शालेय शिक्षण विभागाने अधिकृत सुटीच जाहीर न केल्याने शाळांत उपस्थित असलेल्या शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांना सांभाळायचे कसे हाच प्रश्‍न होता. 

चार दिवसापासून मुंबईत पाऊस कोसळत आहे. सोमवारी सुटीही उशिरा दिली. मंगळवारचा निर्णय हा शनिवारीच घेणे अपेक्षित होते मात्र शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक केली, असा आरोपही पालकांनी केला. मुंबई, ठाणे, पालघर येथे पडत असलेल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून दिला होता. त्यामुळे सुटीचा निर्णय अपेक्षित होता, त्यामुळे शाळाच भरण्याचा प्रश्‍न नव्हता. सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या होत्या. गिरगांव येथील चिकित्सकमध्ये सकाळी घेवून आलेल्या पालकांना तुमच्या जबाबदारीवर मुलांना ठेवा, अन्यथा घेऊन जावा असे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांनी मग घरचा रस्ता धरला होता.  शिक्षण विभागाने सुटी का नाही जाहीर केली अशी तक्रार केली. सकाळच्या सत्रातील शाळा लवकरच भरल्याने ऐन पावसात मुलांना घरी कसे सोडायचे हा प्रश्न शाळांना पडला, पावसामुळे अनेक पालकांना संपर्कही होत नव्हता. अंधेरी येथील सेंट लुईस हायस्कूल, चिल्ड्रेन वेल्फवेअर या शाळेच्या स्कूल व्हॅनचालकांनीच शाळा बंद असल्याचे सांगितल्याने पालकांनी मुलांना सोडलेच नसल्याची माहिती एका पालकाने दिली.

परळ येथील शिरोडकर हायस्कूल, महर्षी दयानंद महाविद्यालय, आर एम भट्ट या शाळांतील सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारीच घरी सोडण्यात आले. राजा शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही घरी सोडण्यात आले. हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याने या परीसरातील शाळा महाविद्यालये पावसामुळे बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना  पावसाच्या पाण्यात घरी कसे सोडून द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाल्याचे शिक्षक भारतीचे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले.  सकाळी शाळा भरल्या पण विद्यार्थी संख्या कमी, त्यात अनेक विरार, नालासोपारा तसेच लांबून येणारे शिक्षक रस्त्यात अडकून पडले, सुटीबाबत कोणत्याही सूचना नसल्याने निर्णय काय घ्यायचा हाच प्रश्‍न अनेक शाळांना व मुख्याध्यापकांना होता. त्यामुळे पावसाचे गांभीर्य शिक्षण विभागाने घेतले नसल्याची टीका विना अनुदानीत मुख्याध्यापक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष मनोज रेडीज यांनी केली.