Sun, Apr 21, 2019 13:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समृद्धी; संपादित जमिनीची अधिसूचना जाहीर

समृद्धी; संपादित जमिनीची अधिसूचना जाहीर

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:19AMआसनगाव : वार्ताहर

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची शहापूर तालुक्यातील संपादित जमिनीबाबतची अधिसूचना 26 जुलै 2018 रोजी जाहीर करण्यात आली. या अधिसूचनेनुसार संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाकडून किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्याकडे मागविण्यात आल्या आहेत. या अधिसूचनेनुसार शहापूर तालुक्यातील एकूण 24 गावांपैकी 3 गावांतील जमीन संपादनाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून, तालुक्यात एकूण 2 हजार 393 शेतकर्‍यांना 428 कोटींचा मोबदला देण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. 

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील शिवमडका या गावापासून हा राष्ट्रीय महामार्ग सुरू होणार असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वडपे येथे संपणार आहे. शहापूर तालुक्यातील 24 गावांपैकी 3 गावे म्हणजेच वाशाळा, अर्जुनली, रास या गावांत शंभर टक्के जमिनीची खरेदी झाली आहे. अधिसूचनेत 21 गावांचा म्हणजेच अंबर्जे, शेई, शेरे, गोलभन, रातांधळे, लाहे, सापगाव, शेलवली, कासगाव, शिरोळ, बिरवाडी, कसारा, खर्डी, धामणी, खुटघर, चांदे, हिव, खुटाडी, सरलांबे, दळखन व अंदाड या सर्व गावातील 217 भूमापन क्रमांक संपादीत केल्याचे शासनाचे सचिव अ. अ. सगणे यांनी जाहीर केले आहे.

प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी प्रांताधिकारी डॉ. संतोष थिटे, शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी शेतकर्‍यांची समजूत काढली. त्यामुळे तालुक्यातील 370.96 हेक्टर खासगी जमिनीपैकी 293 हेक्टर जमीन 559 खरेदीखताच्या माध्यमातून 2 हजार 393 शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या आहेत. या शेतकर्‍यांना 428 कोटी 73 लाख 27 हजार रुपये मोबदला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.