Tue, Nov 20, 2018 23:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरात दहावीचा समाजशास्त्राचा पेपर फुटला

उल्हासनगरात दहावीचा समाजशास्त्राचा पेपर फुटला

Published On: Mar 19 2018 6:46PM | Last Updated: Mar 20 2018 1:49AMउल्हासनगर : वार्ताहर 

10 वी परीक्षेत कोल्हापूरनंतर आता उल्हासनगर येथे सोमवारी इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्राचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर समाजशास्त्राचा पेपर असल्याची माहिती येथील सॅक्रेड हार्ट शाळेच्या संचालकांना मिळताच शाळेने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि एसएससी बोर्डाला तक्रार केली आहे. उल्हासनगरातील खासगी क्‍लास घेणार्‍या एका शिक्षिकेने हा पेपर पाठवल्याची माहिती उघड झाली आहे. 

दहावीची परीक्षा सुरू झाल्यापासून कोल्हापूर येथे 8 मार्च रोजी इंग्रजीचा आणि 16 मार्च रोजी विज्ञान विषयाच्या पेपर फुटीचे प्रकार घडले. त्यातच सोमवारी उल्हासनगर येथे इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र या विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला. सॅक्रेड हार्ट शाळेचे संचालक अल्विन एंथोनी यांना सकाळी एका निनावी फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर हा पेपर फुटल्याची माहिती दिली गेली. याबाबत परीक्षा केंद्र प्रमुख सुवर्णा अदाते यांनी तात्काळ शाळेतील विद्यार्थ्यांचे मोबाईल तपासले असता विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये समाज शास्त्राचा पेपर आढळून आला होता. 

यानंतर परीक्षा केंद्र प्रमुख यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरील पेपर आणि दहावीच्या बोर्डाचा पेपर तपासला असता दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत सारख्या होत्या. त्यामुळे दोन्ही पेपर एकच असल्याचे कळताच सॅक्रेड हार्ट संस्थेचे संचालक एंथोनी यांनी समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची माहिती तात्काळ एसएससी बोर्डाला इमेलद्वारे दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये समाजशास्त्र विषयाचा पेपर आढळला, त्याच्या पालकांना शाळेत बोलावून पेपर फुटीबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. त्यावेळी  पेपर उल्हासनगर येथीलच गोल मैदान परिसरात असलेल्या एका खासगी क्लास चालवणार्‍या एका शिक्षिकेने पाठवल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कल्याणमध्येही पेपर फुटी

कल्याण तालुक्यातील एक खासगी शाळेच्या विद्यार्थ्याने दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता दहावीचा समाजशास्त्राचा पेपर होता. विद्यार्थी परीक्षा देण्याचा तयारीत असताना पावणे दहाच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणार्‍या मेघा बागोरे या शिक्षिकेला त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक प्रश्नपत्रिका आली. ही प्रश्न पत्रिका समाजशास्त्र विषयाची होती. स्वतः एका खाजगी शाळेत शिक्षिका असल्याने मेघा या प्रकाराने हैराण झाल्या. त्यांनी आपली मैत्रीण समाजसेविका पुष्पा रत्नपारखी यांना याबाबतची माहिती दिली.

मेघा यांनी ज्या नंबरवरून ही प्रश्नपत्रिका आली होती त्या नंबरवर फोन केला. त्यावेळी समोरील व्यक्तीने सांगितले की, हा पेपर माझ्या मुलाकडून तुम्हाला चुकून पाठवला गेला आहे. त्यानंतर त्याने हा मॅसेज त्वरित डिलीट केला. मेघा यांनी सोमवारचा समाजशास्त्राचा आणि त्याना व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला पेपर पहिला असता तो सारखाच असल्याचे समोर आले. या दोन्ही महिलांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत ही माहिती पोलिसांना दिली आहे. हा पेपर कल्याण तालुक्यातील एका खासगी नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिकणार्‍या एका मुलाने व्हायरल केल्याचे समोर येत आहे.