होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंदूकबाज मंत्री महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा

बंदूकबाज मंत्री महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

जलसंपदामंत्री महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावत आहेत, असा व्हिडीओ प्रसिध्द झाला असून स्वतः महाजन यांनीही त्याची कबुली दिली आहे. अशाप्रकारे हातात बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे फिरणे हे जलसंपदा मंत्र्यांचे काम तर नाहीच पण भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा आहे. अशाप्रकारे बेजबाबदारपणे शस्त्राचा वापर केल्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

बंदूक काढून स्टंटबाजी करण्याची महाजन यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही महाजन दिव्यांग मुलांच्या कार्यक्रमात आपल्या कमरेला बंदूक लावून गेले होते. एका आमदारालाही त्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्याची घटना समोर आली होती. बंदूक चालवण्याचा अतिआत्मविश्वास कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या कुटुंबियांशी असलेल्या जवळकीतून आला असावा असा टोला सावंत यांनी लगावला.

जलसंपदा खात्यातील ठेकेदारांनी आपल्याला शंभर कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला होता, असे महाजन यांनी सांगितले होते. पण या संदर्भात लाचलुचपत खात्याकडे याची तक्रार केली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दारूला महिलांची नावे द्यावे असे वक्तव्य केले होते. ट्रक चालवण्यासारखे स्टंट ही करून झाले आहेत. कामात झिरो असल्याने स्टंटबाजी करून हिरो होण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून स्टंटबाजी करण्यासाठी हॉलीवूडला पाठवावे असा टोला त्यांनी लगावला.