Fri, Jul 19, 2019 01:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना म्हणते, उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक नाही

शिवसेना म्हणते, उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक नाही

Published On: Feb 27 2018 2:55PM | Last Updated: Feb 27 2018 2:55PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर सोलापूर जिल्ह्यात दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना, शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची अफवा राज्यात पसरली होती. उद्धव ठाकरे आज, नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथे हा प्रकार घडल्याचे वृत्त होते. काही वृत्तवाहिन्यांनी तसे प्रसारित केले होते. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

या संदर्भात शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी म्हटले आहे की, अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली ,असे चुकीचे वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांवर येत आहे हे वृत्त चुकीचे आहे. दगडफेकीची कोणतिही घटना घडलेली झालेली नाही. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम संपल्यानंतर ते निघाले असताना मागील येणाऱ्या एका गाडीने अति घाईत माजी आमदार अनिल राठोड यांच्या अंगावर चुकून गाडी घातली त्याच्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्या गाडीची काच तुटली. त्यामुळे कृपया माध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त देऊ नये ही विनंती. 

या संदर्भात माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी संपर्क साधून नेमके काय घडले, याची माहिती घेण्याचे आवाहन शिवसेनेकडून माध्यमांना करण्यात आले आहे.