Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्ताधारी-विरोधक आज आमनेसामने

सत्ताधारी-विरोधक आज आमनेसामने

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

शुक्रवारी देशभर प्रजासत्ताक दिन साजरा होणार असताना महाराष्ट्रात राज्यभर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईत विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली असताना ही रॅली काढायचीच, असा निर्धार त्यांनी केला आहे. तर, भाजपने प्रत्युत्तर म्हणून राज्यभर तिरंगा यात्रा काढली असून मुंबईतील यात्रेच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून मुख्यमंत्री विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे. 

राज्यात निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले आहे. केेंद्र आणि राज्य सरकार घटनेची पायमल्ली करीत असल्याचा आरोप करीत संविधान बचाव रॅलीचा नारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी दिला आहे. या रॅलीला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली असली तरी ही रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई विद्यापीठाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघेल. या रॅलीत शरद पवार यांच्यासह सीताराम येच्युरी, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, अशोक चव्हाण, हार्दिक पटेल, खा. राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह विरोधी पक्ष एकवटणार आहे. गेट वे ऑफ इंडियावर रॅलीच्या समारोपाची परवानगी नाकारली असली, तरी ही रॅली तेथे जाणार असल्याने राज्य सरकार आणि पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॅली काढल्यास अटक अटळ असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. 

दुसरीकडे या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपने तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात येणार आहे. शिवाजी पार्क, माटुंगा, दादर रेल्वे स्टेशन फूलमार्केट मार्गे एल्फिन्स्टन रोड येथील हुतात्मा बाबू गेणू क्रीडांगणावर येईल. तेथे मुख्यमंत्री या रॅलीला संबोधित करणार आहेत. 

जात, पंथ, भाषा या आधारे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍या स्वार्थी प्रवृत्तींना एकच उत्तर अशी प्रसिद्धी या तिरंगा यात्रेची करण्यात आल्याने मुख्यमंत्री विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी मुंबईतील राजकीय हवा आणखी तापण्याची शक्यता आहे.