सातबारा कोरा, वीज बिल माफ असेल तरच पाठिंबा

Last Updated: Nov 19 2019 1:29AM
Responsive image


पुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा आणि वीज बिल माफ करणार असतील तरच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या संभाव्य सरकारला पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील शेतकर्‍यांचे अवकाळी पाऊस व बर्फवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तेथील शेतकर्‍यांचे उभ्या पिकावरील पीककर्ज माफ करावे आणि काश्मीरमधील शेतकर्‍यांनाही हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू करावी, अशी मागणी केंद्राकडे करणार आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदतीच्या मागणीसाठी पुढील आठवड्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सर्व शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘काश्मीरमधील शेतकर्‍यांचे प्रश्न आणि सद्य:स्थिती’ या विषयावर राजू शेट्टी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाला वगळून सर्व पक्षांनी एकत्र येत सरकार बनवावे, अशी सामान्यांची भावना आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस पक्षामध्ये सरकार स्थापण्याबाबत चर्चा सुरू असून, त्यामध्ये किमान समान कार्यक्रम काय ठरतोय हे आम्ही पाहात आहोत.  शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा करणे व वीज बिलमुक्ती यावर त्यांचा भर असणार का, हे पाहून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.