अभिनयासाठीच जन्मलेला आणि स्पष्टवक्ता 'ऋषी'!

Last Updated: Apr 30 2020 10:56AM
Responsive image
ऋषी कपूर

हरहुन्नरी अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. 


स्‍वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन 

ऋषी तू गेल्याचं तर अमाप दु:ख आहे. जगातून तू इतक्या लवकर रिटायर्ड होशील, असं कधीच विचार देखील केला नव्हता. काल म्हणजे, दि. २९ रोजी हरहुन्नरी कलाकार इरफान खानचेदेखील कॅन्सरने निधन झाले. आता त्याच्यामागून तू ही कॅन्सरने जाशील आणि संपूर्ण चित्रपट इंडस्ट्री आणि चाहत्यांना पोरकं करशील, असं वाटलंदेखील नव्हतं. परंतु, मन घट्ट करून तुझ्या अविस्मरणीय चित्रपटांच्या प्रवासाबद्दल लिहावं लागतयं. तुझ्यासारख्या कलाकाराने कॅमेऱ्यासमोर येऊन अख्ख्या जगाला तू कसं हसवलंस आणि रडवलंस हेदेखील सगळ्यांना समजू दे.    

‘बॉबी’मधला तो ऋषी कपूर पाहिला की, अंगात स्‍वेटर घातलेला २१ वर्षांचा तो तरुण आठवतो. भारतीय मनोरंजन जगताला ऋषी कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी, जी त्‍याने सुंदर अभिनेत्रींसोबत चित्रित केली होती. त्‍यांची त्‍या-त्‍या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत असलेली केमिस्‍ट्रीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस कायमस्‍वरूपी उतरली. 

Image

एकेकाळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरने ‘बॉबी’ या चित्रपटातून नव्हाळीतल्या प्रेमाचा विषय हाताळला. 'बॉबी'मध्‍ये ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचा ऐन तारुण्‍यातील प्रेम पडद्‍यावर दाखवण्‍यात आलं. बॉबी पाहिल्‍यानंतर ऋषीचा अभिनयासाठीच जन्‍म झाला असावा, असं वाटतं. प्रेमातील अनेक प्रसंग ऋषी कपूरने अजरामर करून ठेवले आहेत. त्याचा काळ आणि त्याच्या नंतरच्या काळानेही ऋषीच्या प्रेमासारखं आपलं प्रेम पाहिजे म्‍हणून प्रेमात पडणारी पिढी त्याकाळी निर्माण झाली होती, आणि त्याच्या प्रेमासाठीच ऋषीच्या स्‍वेटरचा ट्रेंड अस्‍तित्‍वात आला.  आणि पुढे अभिनेता म्‍हणून तो अजरामर झाला. 

राज कपूर यांनी शंकर-जयकिशनऐवजी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन 'बॉबी'साठी काम केलं तर ऋषी कपूरच्‍या गाण्‍यांना मुकेश यांना गायला न सांगता शैलेंद्र सिंग यांना गायला सांगितले. विशेष म्‍हणजे, 'बॉबी'तली गाणी सुपरडूपर हिट ठरली म्‍हणून काळ लोटला तरी ऋषी कपूरची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळली.

अभिनेता राज कपूर . प्रत्येक भूमिकेला त्याने जिवंतपणाचा ओलावा दिला. त्‍यांच्‍याच मुलांपैकी एक ऋषी कपूर. ऋषी कपूरसारखं स्‍पिरीट इतरांकडे म्‍हणावं तसं नव्‍हतं. 'बॉबी'ला मिळालेल्‍या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट ऋषीने दिले. ऋषीने डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्‍या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत काम केले. 

ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्‍यांना डेब्यू चाईल्ड अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्‍हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्‍यांना उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार मिळाला. 

सिनेजगतातल्‍या २५ वर्षांच्‍या करकिर्दीत स्वेटर्स घालून, अभिनेत्रींभोवती पिंगा घालण्‍याशिवाय आणि गाणी गाण्यापलीकडे आपण काहीच केले नसल्‍याने त्‍यांनी खुद्‍द कबूल केले आहे. 

Image

... तेव्‍हा खचला ऋषी 

राज कपूर यांनी आर. के. फिल्म्सची कंपनी स्थापन करून चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्‍टुडिओत झाले होते. 'बॉबी' चित्रपटाचे चित्रीकरणही तेथेच झाले होते. ‘श्री. ४२०’चं शूटिंगदेखील तिथलंचं. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं आठवतयं? ‘श्री. ४२०’ मधील या रोमँटिक गाण्‍यात ऋषी केवळ दोन वर्षांचे होते. त्‍यावेळचा शूटिंगचा एक किस्‍सा सांगितला जातो. दोन वर्षांच्‍या ऋषीला भर मुसळधार पावसातून रडत चालायचे होते. परफेक्‍ट सीनसाठी रिटेकवर रिटेक होतात. शूटिंग लांबते. त्‍यामुळे चिंब भिजलेला ऋषी वैतागतो आणि पावसात न जाण्‍याचा हट्‍ट धरतो. तेव्हा ‘तू पपा सांगतील, त्याप्रमाणे केलंस, तर मी तुला चॉकलेट देईन’, असे आमिष अभिनेत्री नर्गिस ऋषीला दाखवले होते. तेव्हापासून ऋषीचं आर. के. स्टुडिओशी वेगळं नातं आहे. म्हणूनच आर. के. स्‍टुडिओला आग लागली, तेव्हा ऋषी पुरता खचला होता. 

Image

ऋषीची खास आठवण 

ऋषी आणि नीतू यांच्या विवाहानंतरच्या जंगी पार्ट्या आर. के. स्‍टुडिओतच झाल्‍या होत्‍या. त्यामुळे ऋषीला आर. के. स्‍टुडिओची लाईफटाईम आठवण राहणारी आहे. 

ऋषीचं 'त्‍या' तरुणीशी अफेअर  

अभिनेत्री नीतू सिंह यांच्‍याशी लग्‍न होण्‍यापूर्वी ऋषीने यास्मीन नावाच्‍या तरुणीला डेट केल्‍याचे म्‍हटले जाते. परंतु, आपण नीतूला कधी धोका दिला नाही, असे खुद्‍द ऋषीने एका मुलाखतीत म्‍हटलं होतं. जेव्‍हा बॉबी चित्रपट आला होता, त्‍यावेळी ऋषी २१ वर्षांचा होता. बॉबी रिलीज झाला, त्‍यावेळी ऋषीचा ब्रेकअप झाल्‍याचे त्‍याने सांगितले होते. 

Image

रोमॅंटिक ऋषीच्‍या गंभीर भूमिका 

गेल्या काही वर्षांमध्‍ये ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, कपूर ॲण्‍ड सन्‍स, राजमा चावल, बेशरम, स्‍टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, ‘मुल्क’ अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ऋषीने रंगवल्‍या. प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट असणारा ऋषीने रोमँटिकचं नव्‍हे तर गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 'मुल्‍क' या चित्रपटातील त्‍याची एका मुस्‍लिम व्‍यक्‍तीची रेखाटलेली भूमिका कौतुकास्पद आहे. 'मुल्‍क'मधील त्‍याची अत्‍यंत सुंदर भूमिका आहे, त्‍यात तापसी पन्‍नूचीदेखील महत्त्‍वाची भूमिका होती. 

या चित्रपटांतून साकारल्‍या वेगळ्‍या भूमिका

मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज, प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्‍थोनी, बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्‍ह आज कल, प्‍यार के काबिल, नमस्‍ते लंडन, रफू चक्‍कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्‍या चित्रपटांतून ऋषी कपूरने वेगवेगळ्‍या भूमिका पार पाडल्‍या.  

Here's Mulk Movie Trailer features Rishi Kapoor and Taapsee Pannu