Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय : पंतप्रधान

अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय : पंतप्रधान

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 2:01AMमुंबई : प्रतिनिधी

भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकरिता गेल्या चार वर्षात अनेक निर्णय घेतल्याने त्याचा चांगला परिणाम अर्थविकासाच्या वृध्दीवर दिसून येत आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्था, सर्वसमावेशक विकास आणि डिजिटल पायाभूत सुविधेवर भर दिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून त्यामुळे नवभारताचा उदय होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयआयबीच्या कार्यक्रमात बोलताना केले.

एशिएन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेची (एआयआयबी) तिसरी वार्षिक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये झाली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वित्तमंत्री पीयुष गोयल, एआयआयबी बँकेचे अध्यक्ष जीन युन यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या एआयआयबी बँकेचे 87 सदस्य असून जगभरातील 12 देशांमध्ये चार अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या 25 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. ही चांगली सुरुवात आहे. एआयआयबी बँकेने वित्तीय पुरवठा असाच ठेवत 2020 मध्ये चार अब्ज डॉलर वरून 40 अब्ज डॉलरवर तर 2025 मध्ये 100 अब्ज डॉलरवर ही गुंतवणुक न्यावी, असे पंतप्रधान म्हणाले. वीज, दळणवळण, दूरसंचार, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, कृषी विकास, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, नगरविकास या क्षेत्रामध्ये अधिकाधिक वित्तीय पुरवठा होण्याची आवश्यकता आहे. एआयआयबी बँकेने हा पतपुरवठा करतानाच त्याचे व्याजदर हे परवडणारे असायला हवेत अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय अर्थव्यवस्थेला गती दिल्याचा परिणाम अर्थविकासाच्या वृध्दीवर दिसून येत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्‍वास वाढला असून गेल्या चार वर्षात 222 अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणूक भारतात झाली. देशाला थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वोच्च प्राधान्य मिळाल्याचे ते म्हणाले. अर्थविकासाला चालना देण्यासाठी विविध नियम आणि कायद्यांमध्ये क्रांतिकारक सुधारणा केल्याचा सकारात्मक बदल अर्थव्यवस्थेवर दिसून येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 
 

एक देश एक कर या संकल्पनेनुसार जीएसटी लागू केला. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली. उद्योगांना गुंतवणूक करताना लागणार्‍या विविध परवान्यांचे आणि त्यासाठीच्या प्रक्रियेचेे सुलभीकरण केले. इज ऑफ डुइंग बिझनेसमुळे जागतिक बँकेच्या पहिल्या शंभर देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 42व्या क्रमांकावर गेल्याचे त्यांनी सांगितले. विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने ती जगाचे ग्रोथ इंजिन बनली असून त्यातूनच नवभारताचा उदय होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.