Mon, Sep 24, 2018 05:11



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीवायएसपींची ही अवस्‍था, मग सामान्य महिलांचे काय ?

डीवायएसपींची ही अवस्‍था, मग सामान्य महिलांचे काय ?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी 

‘नाव, नंबर कशाला हवं, तुला जे काय करायचंय ते कर, आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही’, असे दुसर्‍या तिसर्‍या कुणी नाही तर पोलिसांनी डीवायएसपींना दिलेले हे उत्तर आहे. मुजोर पोलिसांची तक्रार करणार्‍या हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांना मुंबईतील डीएननगर पोलिस स्थानकाच्या कॉन्स्टेबल आणि पोलिस शिपायांकडून ही वागणूक मिळाली आहे. उपअधीक्षक असलेल्या सुजाता पाटील यांनीच फेसबुकद्वारे आपली व्यथा मांडली आहे. त्यामुळे महिला सुरक्षा आणि त्यांना मदत वगैरे निव्वळ गावगप्पा असल्याचे समोर आले आहे.

सुजाता पाटील शनिवारी भोपाळवरुन रेल्वेने मुंबईत आल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा होत्या. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी मुजोरी केली. त्यांनी अंधेरी पश्चिमेला रिक्षाचालकाला भाड्यासाठी विनंती केली. मात्र त्याने भाडे नाकारले. त्याची तक्रार उपस्थित पोलिसांना केली, पण पोलिसांनी सुजाता पाटील यांनाच अपमानास्पद वागणूक दिली. मग त्यांनी डीएननगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार केली, मात्र त्यांच्याकडूही प्रतिसाद मिळाला नाही. 

सुजाता पाटील यांनी आपली व्यथा मांडताना फेसबुकवर म्हणाल्या की, मी भोपाळवरुन ट्रेनिंग आटोपून पंजाब मेलने मुंबईत आले. त्यावेळी मला घरातून फोन आला की, माझ्या मुलीला भरपूर ताप आहे. तेव्हा मी दादरला होते, तिथून मी लोकल ट्रेनने अंधेरीला आले. अंधेरी पश्चिमेला तीन-चार रिक्षाचालकांना विनंती केली, पण त्यांनी थेट डीएननगरला येणार नाही असे सांगितले. रिक्षाचालक एकमेकांकडे पाहून उर्मटपणे माझ्याशी बोलत होते, हसत होते. हा प्रकार पाहून मी उपस्थित पोलिसांना, लांबूनच इशारा करुन माझ्या पायाला दुखापत झाल्याचे सांगितले. तसेच इकडे येऊन, मला रिक्षा बघून देण्याची विनंती केली. त्यावेळी पोलिसांनी आम्ही येणार नाही, तू इकडे ये, असे सांगितले. मग मी फ्रॅक्चर पायाने, बॅगा ओढत पोलिसांकडे गेले. त्यावेळी ट्रॅफिक पोलिस माझ्याकडे पाहून, हसत निघून गेले.

तरीही मी पोलिसांकडे जाऊन, रिक्षावाल्यांची तक्रार केली. मी १८ तास प्रवास करुन आल्याचे, पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही माझ्या मदतीला आला नाहीत, मी प्रवासी आहे असे सांगितलं. तर पोलीस म्हणाले, मी तुमचा नोकर आहे का? तुम्ही मला रिक्षा स्टॅण्डला कशाला बोलवता? त्यावर मी त्यांना सांगितलं की, मला तुमची मदत हवी होती, तर त्यानंतर पोलिसाने माझा अपमान करण्यास सुरुवात केली, असी माहिती पाटील यांनी दिली.

मग मी त्यांना नाव विचारले. तर त्या पोलिसाने नेमप्लेट काढून खिशात ठेवली आणि तू माझे काय वाकडे करणार आहेस असे तो उर्मटपणे बोलला. त्यानंतर शिर्के नावाचे शिपाई बाहेर आले, ते म्हणाले जास्त हुशारी करु नकोस. तुला नाव कशाला पाहिजे, नंबर कशाला पाहिजे. हिचे नाव घे, डायरीत नाव लिहून घ्या, हिची आयडेंडिटी घ्या, तुला काय वाटते आम्ही तुला घाबरतो का?

पोलिसांचं हे वर्तन पाहून मी अतिशय हतबल झाले होते. मी काहीही करु शकत नव्हते.त्यानंतर त्यांनी मला बाजूला हाकलले. मी काहीही बोलत नव्हते. दुसर्‍या एका रिक्षावाल्याला मी विनंती केली, कितीही पैसे घे पण डीएन नगरला चल, अशी याचना केली. माझे अश्रू ढळत होते, अंगाला घाम फुटला होता. त्या रिक्षावाल्याने मला पैसे नको, मी तुम्हाला हवे तिथे सोडते असे सांगितलं. मग मी 100 नंबरला कॉल केला, माझी ओळख सांगितली, पण तिकडूनही मला प्रतिसाद मिळाला नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली. सध्या सुजाता पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवर आता ही पोस्‍ट दिसत नसली तरी ही पोस्‍ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली आहे. नेटिजन्‍सकडून पोलिसांवर आणि रिक्षाचालकांवर जोरदार टीका होत आहे.

त्यानंतर पाटील यांनी डीएन नगरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना फोन केला, पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, ‘वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनीही तीन-चार वेळा फोनच उचलला नाही. ज्यावेळी फोन उचलला त्यावेळी मी त्यांना डीवायएसपी बोलते सांगितले. पण तरीही त्यांनी मिटींगमध्ये असल्याचे सांगून, कॉल कट केला. हा सर्व अपमान मला सहन झाला नाही. हे कुठेतरी थांबायला हवे, या हेतूने मी  भावना अनावर झाल्याने फेसबुक पोस्ट लिहिली. माझे पोलिस दल आदर्शवत व्हावे, ही माझी इच्छा आहे. या दोन पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे’. असे सुजाता पाटील म्हणाल्या.

नोकरी पणाला लावून फेसबूक पोस्ट

पोलीस दलातील अशा कृती थांबायला हव्यात या हेतूने मी फेसबुक पोस्ट टाकली आहे. मी नोकरी पणाला लावून फेसबुक पोस्ट लिहिली. सरकारने मला काहीही शिक्षा दिली, फाशी दिली तरी मी तयार आहे, असं सुजाता पाटील म्हणाल्या.

Tags : riksha driver, and police constable, misbehaviour, hingoli dysp sujata patil, mumbai,






  •