Thu, Jul 18, 2019 21:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुन्हा गुणगुणणार र्‍हिदम हाऊस!

पुन्हा गुणगुणणार र्‍हिदम हाऊस!

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:38AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईच्या संगीत क्षेत्रात मानाचे पान असलेल्या काळाघोडा येथील र्‍हिदम हाऊसवर सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी)टाच आणल्यानंतर त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी पुढाकार घेतला आहे. ज्यावेळी र्‍हिदम हाऊसचा लिलाव होईल, त्यावेळी तमाम मुंबईकरांनी पुढे येऊन त्याची खरेदी करावी आणि नवोदित संगीतकारांसाठी याठिकाणी कलाकेंद्र बनवण्यास मदत करावी, असे आवाहन महिंद्रा यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी बुधवारी विशेष ट्विटर हॅण्डल सुरू केले आहे. 

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याने आपल्या साथीदारांसह बँकांना 12600 कोटी रुपयांना गंडा घालून विदेशात पलायन केले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याच्या भारतातील मालमत्तांवर टाच आणण्याची कारवाई ईडीने सुरू केली. या मालमत्तेमध्ये र्‍हिदम हाऊसचाही समावेश आहे. र्‍हिदम हाऊसची स्थापना सुलेमान नॅन्सी यांनी 1948 मध्ये केली होती. मेहमुद करमलीचे वडील मॅम्मो हे या र्‍हिदम हाऊसचे भागीदार बनले. सुरूवातीच्या काळात संगीतासाठी लागणार्‍या साधनांची विक्री येथून होत होती. नंतरच्या काळात मॅम्मो यांनी दुसर्‍या व्यवसायात उडी घेतली.  1970 च्या सुमारास त्यांनी आपला भाऊ आमीर याला आपल्या व्यवसायात मदत करण्यासाठी कोलकाता येथून बोलावून घेतले.

तेव्हापासून र्‍हिदम हाऊस आमीर यांच्या ताब्यात होते. 2017 मध्ये नीरव मोदीने र्‍हिदम हाऊस विकत घेतले आणि तेथे हिर्‍यांच्या दागिन्यांचे भव्य शोरूम सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून र्‍हिदम हाऊसशी संबंधित असणार्‍या संगीत रसिकांना मोठाच धक्‍काच बसला. अर्थात र्‍हिदम हाऊसचा व्यवहार 2016मध्येच बंद झाला होता. कुणीतरी संगीत प्रेमी पुढे येईल आणि पुन्हा एकदा र्‍हिदम हाऊस नव्या दमाने सुरू होईल अशी आशा रसिकांना वाटत होती.

पण नीरव मोदीच्या घोषणेने पाणी फेरले गेले होते. आता आनंद महिंद्रा यांच्या पुढाकाराने या रसिकांच्या आशा पुन्हा पल्‍लवीत झाल्या आहेत. महिंद्रांनी सुरू केलेल्या ट्विटर हॅण्डलला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, कोटक बँकेचे जय कोटक यांचा समावेश आहे. आतापर्यंत या 1300 संगीतप्रेमी या हॅण्डलचे फॉलोओर्स बनले असून, संगीतकार विशाल ददलानी यांनी र्‍हिदम हाऊसच्या नव्या उभारणीत आपण सक्रीय सहभाग देऊ असे जाहीर केले आहे. तर अतुल खत्री या नकलाकाराने र्‍हिदम हाऊससाठी एकही पैसा मानधन न घेता शो करून पैसे उभे करू, असे म्हटले आहे.