Wed, Jan 23, 2019 00:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोलच्या एक रुपया वाढीवर राज्याला १७ कोटी

पेट्रोलच्या एक रुपया वाढीवर राज्याला १७ कोटी

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:17AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल दर प्रतिलिटर 1 रुपयाने वाढले तरी त्याचे चटके राज्यातील जनतेला सहन करावे लागतात. मात्र, याचवेळी राज्याच्या तिजोरीत मात्र 17 कोटी रुपये जमा होतात! डिझेलच्या दरवाढीपाठीमागेही राज्याचा मोठा फायदा होत आहे. 

राज्यातील अन्य विभागातून अपेक्षित महसूल मिळत नसल्याने राज्य सरकारचे लक्ष तेलातून मिळणार्‍या महसुलाकडे लागले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. विनासायास ही रक्कम राज्याच्या तिजोरीत पडत असल्याने राज्य सरकार गंभीर नसल्याची माहितीही त्यांनी दिली.  

पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. प्रत्येक राज्यात त्याचे दर वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रातही राज्य सरकारने 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2018 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी पेट्रोल-डिझेलवर व्हॅटमधून मिळणार्‍या रकमेचे टार्गेट 10759 कोटी रुपये इतके निश्‍चित केले होते. मात्र, या कालावधीत राज्य सरकारच्या तिजोरीत 10,944 कोटी रुपये जमा झाले.  
2017-18 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलमधून अपेक्षेपेक्षाही मोठी रक्कम मिळाली होती. या आर्थिक वर्षात 22,652 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा झाले होते. पेट्रोलवरच्या व्हॅटद्वारे 9,775 कोटी, डिझेलमधून 12,163 कोटी, तर विमान इंधनामधून 714 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती दिली होती.