Thu, Jul 18, 2019 05:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडिया महामित्र उपक्रमाला उदंड प्रतिसाद 

सोशल मीडिया महामित्र उपक्रमाला उदंड प्रतिसाद 

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 12:47AMमुंबई :

देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉटसप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आधुनिक युगातील या वेगवान संपर्क साधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या सोशल मिडिया महामित्र उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून, केवळ तीन दिवसात दहा हजार समाजमाध्यमकारांनी सहभाग नोंदवला आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून विधायक संदेशाची देवाण-घेवाण होऊन विवेकी समाज तयार व्हावा. सकारात्मक कामासाठी या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी महामित्र हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. यातून समाजमाध्यमांचा प्रभावीपणे वापर करणार्‍यांची निवड करून त्यांचा मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. या क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.

या उप्रकमासाठी 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल. प्रत्येक तालुक्यातून 10 सोशल मीडिया महामित्र निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणार्‍या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.