Fri, Jun 05, 2020 15:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचे ५९, तर काँग्रेसचे ५७ टक्के उमेदवार ‘दागी’

भाजपचे ५९, तर काँग्रेसचे ५७ टक्के उमेदवार ‘दागी’

Last Updated: Oct 19 2019 1:21AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशातील निवडणुकांचे अध्ययन करणार्‍या ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने महाराष्ट्रातील निवडणुकीअंतर्गत मतदानापूर्वीचा आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार निवडणुकीच्या मैदानात आपले भाग्य आजमावत असलेल्या भाजपच्या 162 पैकी 96 म्हणजे 59 टक्के उमेदवारांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 96 पैकी 59 उमेदवारांवर खून आणि खुनाचा प्रयत्न, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही आहेत. म्हणजेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भाजप उमेदवारांचे प्रमाण 36 टक्के आहे.  

काँग्रेसचे एकूण 83 उमेदवार याबाबतीत ‘दागी’ आहेत. एकूण उमेदवारांपैकी काँग्रेसचे 57 टक्के उमेदवार हे विविध गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांत खटल्यांचा सामना करीत आहेत. काँग्रेसच्या 44 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांपैकी 48 टक्के उमेदवारांवर तर राष्ट्रवादीच्या 35 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ‘एडीआर’ संस्थेने 3237 उमेदवारांपैकी 3112 उमेदवारांतर्फे दाखल शपथपत्रांचा अभ्यास केला आहे. एकूण उमेदवारांपैकी 916 उमेदवारांवर (29 टक्के) सामान्य गुन्ह्यांत खटला अगर खटले दाखल आहेत. 600 उमेदवारांविरुद्ध (19 टक्के) गंभीर प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. 19 उमेदवारांविरुद्ध खून प्रकरणी तर 60 उमेदवारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. 67 उमेदवारांवर महिलांविरुद्ध गुन्हे केल्याची प्रकरणे दाखल आहेत. चौघांवर तर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.