Sat, Jul 20, 2019 15:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्याजदरांत कपात शक्य!

व्याजदरांत कपात शक्य!

Published On: Jan 26 2018 1:43AM | Last Updated: Jan 26 2018 1:36AMमुंबई : पीटीआय

नव्या आर्थिक वर्षात सामान्यांसह मध्यमवर्गीयांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. महागाईचा धोका संपुष्टात आल्याने आरबीआयकडून एप्रिलच्या पतधोरणात रेपोदरात पाव टक्क्यांनी कपात होण्याची चिन्हे असून, बँकांकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे.

अमेरिकास्थित मेरिल लिंच या वित्तीय संस्थेने भारतातील महागाई आणि व्याजदराबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात गेल्या डिसेंबरअखेरपर्यंत 5.2 टक्क्यांपर्यंत महागाईचा दर पोहोचला होता. आता महागाईचा दर नियंत्रणात आला आहे. त्यामुळे निश्‍चितच आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या पतधोरण आढाव्यातच आरबीआयकडून रेपोदरात 0.25 टक्के घट होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत आरबीआयची पतधोरण समिती यासंदर्भात आढावा घेईल. मान्सूनच्या आगमनास ‘अल् निनो’चा धोका नसल्याने अन्‍नधान्याच्या किमतीही जूनपर्यंत आटोक्यात राहणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असले तरी कच्च्या तेलाचे भावही या वर्ष अखेरीपर्यंत प्रतिबॅरल 62 डॉलर्सपर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत. या सर्व बाबींचा पतधोरण समिती आढावा घेऊन व्याजदर कपातीबाबत आरबीआयला शिफारस करेल, असे या अहवालात म्हटले आहे.

महागाईबाबत एसबीआयचा अहवालही अनुकूल 

गेल्या दीड वर्षात महागाई दर प्रथमच उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे आरबीआयने अलीकडच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यास पसंती दिली. एसबीआयनेसुद्धा आपल्या अहवालात जानेवारी अखेरपर्यंत किरकोळ महागाई दर आटोक्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. व्याजदर कमी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने आरबीआयच्या आगामी पतधोरणाकडे वित्तीय क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.