Tue, Apr 23, 2019 13:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जागतिक शिक्षण संस्थांसाठी अंथरल्या पायघड्या

जागतिक शिक्षण संस्थांसाठी अंथरल्या पायघड्या

Published On: Sep 12 2018 2:17AM | Last Updated: Sep 12 2018 2:10AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी (इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज)  विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे.

देशातील युवकांना जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण मिळण्यासाठी अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसह नवीन खाजगी संस्थांपैकी जागतिक दर्जाच्या 20 संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थापन होणार्‍या अशा प्रकारच्या संस्थांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या संस्था कोणत्याही जमिनीवर स्थापन करता येणार असून त्यांना ग्रॉस प्लॉट एरियावर एक इतका चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे. मंजूर अभिन्यासांतर्गत जमिनींचे मानीव अकृषिक रुपांतरण होईल आणि त्यासाठी वेगळ्या अकृषिक परवानगीची आवश्यकता राहणार नाही. विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यास विद्यापीठाच्या प्रवर्तकांना मुभा राहील. मात्र ही जमीन कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार अधिसूचित करून घेणे आवश्यक राहील. चटई क्षेत्राच्या निकषांची ठराविक कालावधीत पूर्तता न केल्यास वाढीव वापरलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकावर बाजारमूल्य आकारणी व दंड आकारण्यात येईल.  या संस्थांचा इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज हा दर्जा रद्द झाल्यास त्यांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा रद्द करण्यात येतील.