Thu, Jun 04, 2020 19:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोनाचा वेग ३ पट वाढला

मुंबईत कोरोनाचा वेग ३ पट वाढला

Last Updated: May 24 2020 1:40AM
मुंबई : राजेश सावंत

मुंबई शहरात कोरोना संसर्गाचा वेग तीन पटीने वाढला आहे. महिनाभरापूर्वी पहिल्या पाच दिवसांत कोरोना रुग्णांच्या संसर्गाचा वेग 1 हजार 835 इतका होता. यात दिवसेंदिवस वाढ होत जात, संसर्ग रुग्णांचा वेग गेल्या 5 दिवसांत म्हणजे 17 ते 22 मे या काळात 7 हजार 101 ने वाढला आहे. पुढील काळात हा वेग अजून वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मे अखेरपर्यंत महाराष्ट्र ग्रीन झोनमध्ये आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत संपत आली तरी मुंबईत कोरोनाचा कहर कायम आहे आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा जोर ओसरलेला नाही. 

जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात मात्र महिनाभरापूर्वी कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नव्हता. 22 एप्रिलपर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 754 इतकी होती. त्यानंतर पुढील दहा दिवसांत कोरोना संसर्गाचा वेग फारसा वाढलेला नाही. 22 एप्रिल ते 2 मे या दहा दिवसांत कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात होता. या दहा दिवसांत रुग्णांची संख्या अवघ्या 4 हजार 418 ने वाढली. 2 मेनंतर मात्र कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला. 2 ते 7 मे या  दिवसाच्या कालावधीत रुग्णसंख्या 3 हजार 47 ने वाढली. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग अजूनच वाढला. 7 ते 12 मे या पाच दिवसांत रुग्णांच्या संख्येत 3 हजार 562 ने वाढ झाली. 12 ते 17 मे या पाच दिवसांत 5 हजार 186 तर 17 ते 22 मे या पाच दिवसांत 7 हजार 101 रुग्ण वाढले.

कोरोना रुग्णवाढीचा हा चढता आलेख यापुढे अजूनच वाढण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत 23 हजार 314 ने वाढ झाली आहे. या वाढीचा वेग दर पाच दिवसांनी 8 हजाराच्या घरात राहिल्यास, पुढील महिनाभरात 45 ते 50 हजाराने रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 75 हजाराच्या घरात पोहोचेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पालिकेने खबरदारीची उपाययोजना म्हणून बेडच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 70 हजारांहून जास्त बेडचे नियोजन करण्यात आले आहे.