Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’ शिवसेनेचा टोला

‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’ शिवसेनेचा टोला

Published On: Mar 24 2018 9:58AM | Last Updated: Mar 24 2018 9:15AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात उंदीर घोटाळा झाल्याचा गौप्‍यस्‍फोट केल्यानंतर शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून जोरदार टीका करण्यात आली आहे. 

"उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळय़ाचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे!" अशा शब्दात शिवसनेनेने भाजपाला फटकारले आहे. 

उंदीर घोटाळ्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात ‘उंदीर घोटाळा’ झाल्याचा स्फोट केला. त्यामुळे देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळ्याची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली. खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळयाचा स्फोट केला हे त्यांनाच माहीत, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे ‘कार्य’ करू शकतात, हे उघड झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळय़ाची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली आहे. विधिमंडळातील या गौप्यस्फोटामुळे घोटाळेबाज असा शिक्का बसलेल्या मंत्रालयातील उंदीरमामांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे कळायला मार्ग नाही. कदाचित, हे आरोप हेतुपुरस्सर आणि मूषकयोनीला बदनाम करण्याचे कारस्थान आहे असे म्हणत  राज्यभरातील मूषकराजांचा एखादा लाँगमार्च उद्या मुंबईवर धडकू शकतो अशी शक्‍यता सामनातून वर्तवण्यात आली आहे.  

नवा संदेश

सरकारची तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते, हा नवा संदेश समस्त घोटाळेबाजांना दिला आहे. तिकडे परदेशात लपून बसलेले नीरव मोदी आणि विजय मल्ल्या हेदेखील हे नवे घोटाळा तंत्र आपल्याला आधी का कळले नाही या विचाराने हैराण आहेत म्हणे. त्यांच्या फार्म हाऊसच्या आवारात बागडणाऱ्या उंदरांनी मंत्रालयातील उंदरांना तसे व्हॉटस् ऍप मेसेज पाठवल्याची  वदंता आहे. खरेखोटे त्या उंदरांनाच माहीत, पण हा ‘मूषक योग’ आपल्या कुंडलीत असता तर ना बँक घोटाळा करावा लागला असता. ना परदेशात पळून जाण्याची वेळ आली असती, असे त्यांना वाटत असावे. राज्याच्या इतर भागांतील उंदरांनाही मंत्रालयातील ‘बांधवां’चा सध्या हेवा वाटतोय. मंत्रालयात आपली निदान ‘डेप्युटेशन’वर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा शासन आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात येत आहे. उंदीर निर्मूलन मोहिमेत मंत्रालयातील तीन लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत मारले गेले. म्हणजे दिवसाला ४५ हजारांवर उंदीर मारण्यात आले असल्याचे या अग्रलेखातून खोचकपणे सांगण्यात आले आहे. 

राज्याच्या इतर भागातील उंदरांनाही मंत्रालयातील उंदरांचा हेवा वाटतोय. मंत्रालयात आपली निदान डेप्युटेशनवर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समजते, असे सांगत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला.

उंदीर घोटाळा हा एक नवीन शब्द यानिमित्ताने शब्दकोशात समाविष्ट झाला आहे. इतरही काही नवी विशेषणे, म्हणी, वाक्प्रचार प्रचारात येण्याची चिन्हे आहेत. ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ असे म्हणण्याऐवजी भविष्यात ‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’ असे म्हटले जाईल. ‘कागदी घोडे’ असा शब्द सरकारी  कामकाजासंदर्भात वापरला जातो. त्याची जागा ‘कागदी उंदीर’ हा शब्द घेईल अशी टीका टिपणी या घोटाळ्याबाबत शिवसेनेने केली आहे.